जागतिक योगा स्पर्धेत यवतमाळच्या श्रद्धा मुंधडा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 10:14 AM2018-05-08T10:14:54+5:302018-05-08T10:15:04+5:30
जागतिक योगा अजिंक्यपद स्पर्धेत यवतमाळची योगपटू श्रद्धा राजीव मुंधडा हिने व्यावसायिक योगा प्रकारात दैदिप्यमान कामगिरी करीत अव्वल स्थान पटकाविले.
नीलेश भगत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जागतिक योगा अजिंक्यपद स्पर्धेत यवतमाळची योगपटू श्रद्धा राजीव मुंधडा हिने व्यावसायिक योगा प्रकारात दैदिप्यमान कामगिरी करीत अव्वल स्थान पटकाविले. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स येथे झालेल्या स्पर्धेत तिने यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
अर्जेंटिना येथील जागतिक योगा अजिंक्यपद स्पर्धेत १८ देश सहभागी झाले होते. भारताकडून १७ खेळाडूंनी भाग घेतला. या स्पर्धेत यवतमाळात ‘रबर की गुडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेली श्रद्धा सहभागी झाली होती. तिने यापूर्वी एशियन योगा स्पर्धेत सेऊल व थायलंड येथे दोन सुवर्ण, दोन रौप्य पदक प्राप्त केले होते. दक्षिण अमेरिका खंडातील चिली देशात जागतिक योग स्पर्धेत तिची भारतातर्फे निवड झाली होती. परंतु ही स्पर्धा काही कारणास्तव रद्द झाली. त्यामुळे अर्जेंटिना येथील स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाल्याने तिने सुवर्णमय कामगिरी केली. आॅक्टोबर २०१७ मध्ये उत्तर प्रदेशातील गझियाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय योग स्पोर्टस् चॅम्पियन स्पर्धेतील कामगिरीवरून तिची या स्पर्धेसाठी निवड झाली होती.
आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. जागतिक स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. मला योगासाठी सहकार्य करणाऱ्या व पाठिंबा देणाऱ्यांमुळेच हे यश संपादित करू शकले.
- श्रद्धा मुंधडा
योगपटू, यवतमाळ