यवतमाळच्या तरुण संगीतकाराची सिनेजगतात भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:35 AM2019-04-30T11:35:06+5:302019-04-30T11:35:31+5:30
मुंबईच्या मायानगरीपासून दूर असलेल्या यवतमाळनगरीतही कलावंतांची खाण आहे. येथील एका कलासक्त तरुणाने ख्यातनाम संगीतकार ए.आर.रहमान यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आणि बिगबजेट मराठी सिनेमाला पार्श्वसंगीतही दिले आहे.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मुंबईच्या मायानगरीपासून दूर असलेल्या यवतमाळनगरीतही कलावंतांची खाण आहे. येथील एका कलासक्त तरुणाने ख्यातनाम संगीतकार ए.आर.रहमान यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आणि आतातर थेट बिगबजेट मराठी सिनेमाला पार्श्वसंगीतही दिले. शान, जावेदअली, सुखविंदरसिंगसारख्या आघाडीच्या गायकांनी त्याच्या संगीतदिग्दर्शनात गायन केले आहे. अजिंक्य किशोर सोनटक्के असे या वयाने कोवळ्या आणि मेहनतीने परिपक्व तरुणाचे नाव आहे.
सिनेजगतात संगीत दिग्दर्शक बनलेला अजिंक्य केवळ २५ वर्षांचा आहे. नदिम शेख हे एस.आय.प्रोडक्शन अंतर्गत बनवत असलेल्या मराठी चित्रपटासाठी अजिंक्यचे संगीत आहे. त्यात एकंदर पाच गाणी असून यातील चार गाण्यांचे रेकॉर्डिंग शान आणि जावेद अली यांच्या आवाजात पूर्ण झाले आहे. तर लवकरच पाचवे गाणे सुखविंदर सिंग गाणार आहेत. शिवाय, शान यांच्यासोबत अनिशा सैकियानेही एक गाणे गायिले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन फिरोजखान करीत असून कोरिओग्राफर गणेश आचार्य आहेत. तर गीतकार यवतमाळचेच पद्माकर मलकापुरे आहेत.
शान आणि जावेदअली यांनीही अजिंक्यच्या संगीत रचनांची तसेच संगीत संयोजनाचे कौतुक केले. विशेष म्हणजे, रेकॉर्डिंग स्टुडिओचे ठरलेले भाडेही न घेता त्यांनी अजिंक्यला शाबासकी दिली.
यवतमाळच्या अकादमीची बॉलिवूडला देण
तरुण संगीतकार अजिंक्य सोनटक्के हा यवतमाळ येथील नटराज संगीत कलाअकादमीचे संचालक डॉ. किशोर सोनटक्के यांचा मुलगा आहे. वडिलांचे संस्कार त्याला मिळाले आहेत. त्याने वयाच्या चौथ्या वर्षीच स्टेजवर परफॉर्म केल्यानंतर बाराव्या वर्षी संगीतकार कल्याणजी आनंदजी प्रस्तुत लिटील स्टार ग्रुपमध्ये आॅक्टोपॅड व गिटार वादन केले. पुढील तीन वर्षे जगविख्यात संगीतकार ए.आर.रहमान यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. तेथे पियानो, साउंड इंजिनिअरिंग, म्युझिक प्रॉडक्शन, स्टाफ नोटेशनचे धडे गिरविले. लंडन युनिव्हर्सिटीतून पियानोवादनात अजिंक्य मेरिट आला. साउंट इंजिनिअरिंगमध्येही ‘टॉप’ केले. पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेल्या यवतमाळच्या अकादमीचा हा कलावंत आता बॉलीवूड पादाक्रांत करण्याकडे सुरू झाला आहे.
‘जिंदगी’ला ८ तासात दीड लाखांची पसंती
काही दिवसापूर्वीच अंजिक्यचे संगीत असलेल्या ‘जिंदगी’ या रॅपसाँगला इन्स्टाग्रामवर ८ तासात १ लाख ४९ हजार लोकांनी पाहिले. तर आता ४ लाख १७ हजार लोकांनी पसंती दिली. आतापर्यंत अजिंक्यने १५ हिंदी, ४ गुजराती, तर ५ पंजाबी चित्रपटांना संगीत दिले आहे. सध्या तो अमर मोहीले यांच्यासोबत पार्श्वसंगीताचे काम करतो. २०१५ मध्ये नोकिया कंपनीसाठी त्याने दोन रिंगटोनही केल्या. टाईम्स म्युझिकनिर्मित आणि सोनू निगम यांनी गायन केलेल्या अल्बमलाही अजिंक्यने संगीत दिले आहे.
शान यांनी गायलेल्या दोन गाण्यांपैकी एक ड्रिम साँग तर दुसरे डान्स लव साँग आहे. जावेद अलींच्या दोन गाण्यांपैकी एक सॅड साँग आहे. तर दुसरी मराठी कव्वाली आहे. बॉलीवूडमधील या आघाडीच्या गायकांसोबत काम करताना वेगळा अनुभव मिळाला.
- अजिंक्य किशोर सोनटक्के, संगीतकार, यवतमाळ