यवतमाळ जिल्ह्यात कोंबडबाजार बहरला, दररोज लाखोंची उलाढाल, गोरगरीब शेतक-यांचे खिसे होताहेत रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 06:20 PM2017-11-28T18:20:40+5:302017-11-28T18:22:10+5:30

यवतमाळ जिल्ह्याच्या वणी आणि पांढरकवडा उपविभागात अनेक ठिकाणी कोंबडबाजार बहरला आहे. कोंबड्याच्या झुंजीवर पैसा लावण्याच्या या खेळात दररोज प्रत्येक ठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल होत आहेत. पोलिसांच्या संरक्षणात हा कोंबडबाजार सुरू आहे, हे विशेष. 

Yawatmal district's Kombud Bajar, millions of turnover, poor farmers and poor farmers are empty | यवतमाळ जिल्ह्यात कोंबडबाजार बहरला, दररोज लाखोंची उलाढाल, गोरगरीब शेतक-यांचे खिसे होताहेत रिकामे

यवतमाळ जिल्ह्यात कोंबडबाजार बहरला, दररोज लाखोंची उलाढाल, गोरगरीब शेतक-यांचे खिसे होताहेत रिकामे

Next

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याच्या वणी आणि पांढरकवडा उपविभागात अनेक ठिकाणी कोंबडबाजार बहरला आहे. कोंबड्याच्या झुंजीवर पैसा लावण्याच्या या खेळात दररोज प्रत्येक ठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल होत आहेत. पोलिसांच्या संरक्षणात हा कोंबडबाजार सुरू आहे, हे विशेष. 
वणी उपविभागातील पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुर्दापूर येथे आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर नुकतीच पोलिसांनी धाड घातली. तेथून ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तेलंगणा-आंध्रप्रदेशातील २३ प्रतिष्ठीत जुगा-यांना अटक करण्यात आली. वणी एसडीपीओंच्या हद्दीतील या जुगारावर पांढरकवड्याच्या एसडीपीओंनी धाड घातली, हे विशेष. या धाडीच्या निमित्ताने वणी व पांढरकवडा उपविभागातील इतरही अवैध व्यवसायांची आता चर्चा होऊ लागली आहे. आंतरराज्यीय सीमेवरून राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर अंमली पदार्थ, जनावरे, प्रतिबंधित गुटखा, तेलंगणातील एक रुपया किलोने मिळणारा तांदूळ, चांदी याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. त्यातच आता कोंबडबाजारही चर्चेत आले आहेत. 
वणी व पांढरकवडा या दोनही उपविभागात डझनावर कोंबडबाजार आहेत. त्यातील मंदर, कुंभा, कोलारपिंपरी, मोरदवाकोडी, घाटंजी तालुक्यातील चोरंबा अशा काही कोंबडबाजारांवर सर्वाधिक उलाढाल होत असल्याचे सांगितले जाते. चोरंबाचा कोंबडबाजार तर जणू वर्षभर चालतो. मारेगाव, वणी, शिरपूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रमुख कोंबडबाजार आहेत. तेथे दारू, जुगार व खानपानाची सर्वच व्यवस्था उपलब्ध असते. तेथे एका-एका कोंबड्यावर पाच ते दहा लाखांची बोली लावली जाते. तेलंगणा-आंध्रप्रदेशातील शौकीन या कोंबडबाजारावर खेळण्यासाठी येतात. सुर्दापूर येथील आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर पडलेल्या धाडीने ही बाब सिद्धच केली आहे. पोलीस चौकी, ठाणे एवढेच नव्हे तर उपविभागीय पोलीस कार्यालयांचेसुद्धा या तमाम अवैध धंद्यांना अभय राहत असल्याचे सांगितले जाते. पोलिसांच्या संरक्षणाशिवाय हे अवैध धंदे चालू शकत नाही, हीबाब सर्वश्रृत आहे. या धंद्यांवरून वसुलीसाठी पोलीस अधिका-यांनी आपले मर्जीतील ‘खास’ कर्मचारी नेमले आहेत. या धंद्यातील लाभाचे संबंधित सर्वच वाटेकरी आहेत. शेतक-यांच्या घरात पीक आल्यानंतर ऐन हिवाळ्यात हे कोंबडबाजार अधिक बहरतात. शेतमाल विकून आलेल्या शेतक-यांना हेरले जाते, दारू पाजून त्यांचे खिसे कोंबडबाजारात रिकामे केले जातात. यासाठी कोंबडबाजारच्या संचालकांकडून कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाहेर माल विकून आलेल्या शेतक-यांना हेरण्यासाठी खास दलाल नेमलेले असतात. वणी, पांढरकवडा उपविभागातील हे कोंबडबाजार जिल्ह्यातील शेतक-यांच्या हक्कासाठी लढणारे राजकारणी, स्वयंसेवी संस्था आणि यवतमाळ किंवा अमरावतीच नव्हे तर मुंबईपर्यंतच्या पोलीस प्रशासनासाठी आव्हान ठरले आहे.

Web Title: Yawatmal district's Kombud Bajar, millions of turnover, poor farmers and poor farmers are empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.