यवतमाळ अर्बनचा निकाल अन्य बँकांसाठी धोक्याची घंटा

By admin | Published: January 14, 2016 03:07 AM2016-01-14T03:07:36+5:302016-01-14T03:07:36+5:30

संघ-भाजपाच्या शिस्तबद्ध प्रचार मोहिमेत यवतमाळ अर्बन को.आॅप. बँकेचे परंपरागत संचालकांचे पॅनल भूईसपाट झाले.

Yawatmal Urban Result | यवतमाळ अर्बनचा निकाल अन्य बँकांसाठी धोक्याची घंटा

यवतमाळ अर्बनचा निकाल अन्य बँकांसाठी धोक्याची घंटा

Next

मतदारांना गृहित धरणे भोवले : एकहाती विजयाने भाजपाच्या मंत्री-आमदारांची प्रतिष्ठा राहिली शाबूत
यवतमाळ : संघ-भाजपाच्या शिस्तबद्ध प्रचार मोहिमेत यवतमाळ अर्बन को.आॅप. बँकेचे परंपरागत संचालकांचे पॅनल भूईसपाट झाले. या पॅनलच्या भ्रमाचा भोपळा फुटला. हा निकाल आगामी काळात निवडणूकीला सामोरे जाणाऱ्या अन्य बँकांच्या सत्ताधारी संचालकांसाठी धोक्याचा अलर्ट देणारा ठरला आहे.
यवतमाळ अर्बन को.आॅप. बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीचे निकाल बुधवारी पहाटे हाती आले. १६ पैकी एक जागा आधीच बिनविरोध झाली होती. उर्वरित १५ पैकी १२ जागांचे निकाल जाहीर झाले. तर तीन जागांचे निकाल उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राखून ठेवण्यात आले आहे. १९ जानेवारीनंतर ते जाहीर केले जातील. या निवडणुकीत गेली कित्येक वर्ष बँकेची धुरा सांभाळणाऱ्या भाऊसाहेब मारोडकर व सुशील कोठारी यांच्या समन्वय पॅनलचा पुरता धुव्वा उडाला. जाहीर झालेल्या सर्व १२ ही जागा मनोहर देव- अजय मुंधडा-आशिष उत्तरवार यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने जिंकल्या. १८०० कोटींच्या ठेवी असलेल्या या बँकेच्या निवडणूक प्रचारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपाचे मंत्री, आमदार व वरिष्ठ पदाधिकारी स्वत: उतरल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्यामुळेच संपूर्ण विदर्भाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. राज्यात १३३ मतदान केंद्र आणि ७३ हजार ५०० मतदार एवढा मोठा या निवडणुकीचा व्याप होता. मात्र अर्बन बँकेचा हा गड संघ-भाजपाने आपल्याच घरात वाढलेल्या भाऊबंधांना धक्का देऊन सर केला.
समन्वय पॅनलचे नेते-संचालक गेल्या कित्येक वर्षांपासून यवतमाळ अर्बन बँकेची धुरा सांभाळत आहे. या काळात त्यांनी हजारोंना मदतीचा हात दिला. अडचणीच्या वेळी शक्य त्या सर्वांना कर्ज स्वरूपात मदत केली. सामाजिक उपक्रमातही हिरीरीने सहभाग घेतला. त्यामुळे या उपकाराची परतफेड म्हणून मतदार पुन्हा आपल्यालाच संधी देतील अशी समन्वयला अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात त्यांचा अपेक्षा भंग झाला. समन्वयच्या प्रचाराचा प्रचंड गाजावाजा होता. या उलट स्थिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार पॅनलची होती. शांततेने आणि शिस्तबद्धपणे सहकारचा प्रचार सुरू होता. त्यामुळेच त्यांची बाहेर हवा दिसत नव्हती. या न दिसणाऱ्या प्रचाराची भुरळ पडल्यानेच समन्वयचे नेते एकहाती विजयाचा दावा करीत होते. प्रत्यक्षात निकालानंतर त्याच्या उलटे चित्र पुढे आले. या निकालाने समन्वयच्या नेत्यांना अक्षरश: जमिनीवर आणले. शिवाय मतदार-कर्जदारांना गृहित धरणाऱ्या, विजयाच्या भ्रमात राहणाऱ्या विद्यमान संचालकांसाठी यवतमाळ अर्बन बँकेचा हा निकाल डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे. मतदारांनी ‘चेंज’चा नारा दिल्यास निवडणुका होऊ घातलेल्या अन्य बँकांमध्येही यवतमाळ अर्बनची पुनरावृत्ती होऊ शकते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Yawatmal Urban Result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.