यवतमाळची नवी ओळख ‘वाघांचा जिल्हा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 10:01 PM2019-07-28T22:01:20+5:302019-07-28T22:01:50+5:30
कापसाचा जिल्हा, शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा या ओळखींच्या पलिकडे यवतमाळला आता ‘वाघांचा जिल्हा’ असे नवे बिरुद चिकटण्याची शक्यता आहे. टिपेश्वर अभयारण्य आणि अभयारण्याच्या लगतच्या क्षेत्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यभरातील पर्यटकांचे लक्ष यवतमाळने वेधून घेतले आहे.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कापसाचा जिल्हा, शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा या ओळखींच्या पलिकडे यवतमाळला आता ‘वाघांचा जिल्हा’ असे नवे बिरुद चिकटण्याची शक्यता आहे. टिपेश्वर अभयारण्य आणि अभयारण्याच्या लगतच्या क्षेत्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यभरातील पर्यटकांचे लक्ष यवतमाळने वेधून घेतले आहे. सोमवारी साजऱ्या होत असलेल्या जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या व्याघ्रवैभवावर एक नजर.
वाघांच्या अधिवासाबाबत, संख्येबाबत जनजागृती वाढविण्यासाठी २९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. नेमकी याच जागृतीची यवतमाळ जिल्ह्यात मात्र उणीव आहे. पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात वाघांच्या अधिवासासाठी अनुकूल नैसर्गिक वातावरण असले तरी स्थानिक नागरिकांमध्ये त्याबाबत जागृती नाही. शासनाच्या दुर्लक्षामुळे हे अभयारण्य अद्यापही व्याघ्र प्रकल्प घोषित होऊ शकले नाही.
प्रत्यक्षात अभयारण्य आणि अभयारण्याच्या आजूबाजूच्या परिसरात जवळपास २९ वाघांचा वावर असल्याची माहिती या भागातील वन्यजीव अभ्यासक डॉ. राजू विराणी यांनी दिली. यंदाच्या हंगामात तर मुंबईपासून पुण्यापर्यंतच्या पर्यटकांनी टिपेश्वरला भेट दिली. वाघांची संख्या सतत वाढत असल्यामुळे आता जिल्ह्यात निसर्ग पर्यटन, कम्युनिटी टुरिझमला मोठा वाव निर्माण झाला आहे.
स्थानिकांना रोजगाराची संधी
टिपेश्वर अभयारण्यात पूर्ण वाढ झालेले चार वाघ, सहा सबअॅडल्ट वाघ (दीड ते दोन वर्ष वय), आणि सात बछडे असे १७ वाघ आहेत. शिवाय तीन वाघ इतरत्र ‘मायग्रेट’ झाले आहेत. तर अभयारण्याच्या बाहेर पांढरकवडा वनक्षेत्रात जवळपास १२ वाघ वावरत असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक डॉ. राजू विराणी यांनी दिली. मात्र अवैध जंगल तोड, अनिर्बंध चराई, अतिक्रमण याबाबींमुळे जंगलांवर ताण वाढत आहे. या परिस्थितीत स्थानिक लोकांना वन्यजीव संरक्षण व संवर्धन याबाबत प्रशिक्षण दिल्यास निसर्ग पर्यटनातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे.