२०१८ या नव्या वर्षात खगोेलीय घटनांची मेजवानी; अभ्यासकांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 09:44 AM2017-12-18T09:44:53+5:302017-12-18T09:45:33+5:30
पंधरा दिवसात नवे वर्ष उजाडत आहे. २०१८ हे नवे वर्ष विविध खगोलीय घटनांनी भरलेले राहणार आहे. दोन चंद्रग्रहणे, खग्रास सूर्यग्रहण यावर्षी पाहता येणार आहेत.
रूपेश उत्तरवार ।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : पंधरा दिवसात नवे वर्ष उजाडत आहे. २०१८ हे नवे वर्ष विविध खगोलीय घटनांनी भरलेले राहणार आहे. दोन चंद्रग्रहणे, खग्रास सूर्यग्रहण यावर्षी पाहता येणार आहेत. युरेनस, बुध आणि गुरू पृथ्वीच्या जवळून फिरताना दिसणार आहे. शिवाय, उल्का वर्षावाचा नजाराही खगोल अभ्यासकांसाठी मेजवानी ठरणार आहे.
२ जानेवारीला चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी ‘सुपरमुन’चा अनुभव येणार आहे. ४ जानेवारीला पृथ्वी सूर्यापासून किमान अंतरावर राहणार आहे. तर ३१ जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण आहे. ३१ मार्चला ‘ब्ल्यू मुन’चा योग आहे. २९ एप्रिल रोजी पश्चिमेला बुध ग्रह जास्तीत जास्त उंचीवर दिसणार आहे.
९ मे रोजी गुरू ग्रह पृथ्वीपासून किमान अंतरावर असणार आहे. यामुळे हा ग्रह अत्यंत प्रकाशमान दिसणार आहे. २७ जूनला शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ दिसणार आहे. ४ जुलैला पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असणार आहे. २७ जुलैला खग्रास चंद्रगहण पाहायला मिळणार आहे. १७ आॅगस्टला शुक्र ग्रह पृथ्वीपासून जास्ती जास्त उंचीवर पाहायला मिळणार आहे. ७ सप्टेंबरला नेपच्यून ग्रह पृथ्वीपासून किमान अंतरावर राहणार आहे.
नोव्हेंबरमध्ये उल्का वर्षाव
खगोल अभ्यासकांना २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात आकाशात ‘फटाक्यांची आतषबाजी’ पाहण्याची संधी मिळेल. १७ आणि १८ नोव्हेंबरला मध्यरात्री २ नंतर उल्का वर्षाव पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आकाशात विलोभनीय रोषणाई दिसणार आहे.
२०१८ हे खगोलीय घटनांच्या उलथापालथीचे वर्ष आहे. अनेक घटना अनुभवता येणार आहे. यामुळे खगोलीय अभ्यासकांच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचे आहे.
- रवींद्र खराबे, स्काय वॉच ग्रुप, यवतमाळ