दीड वर्षापासून शिक्षकांच्या जीपीएफचा घोळ
By admin | Published: May 6, 2017 12:21 AM2017-05-06T00:21:41+5:302017-05-06T00:21:41+5:30
शिक्षकांच्या वेतनातून कपात केली जाणारी जीपीएफची रक्कम त्यांच्या खात्यात जमाच करण्यात न आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.
लेखा विभागावर प्रश्नचिन्ह : लाखोंची कपात पण खात्यात शून्य, पंचायतचा ढिसाळ कारभार
स्थानिक प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिक्षकांच्या वेतनातून कपात केली जाणारी जीपीएफची रक्कम त्यांच्या खात्यात जमाच करण्यात न आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. गेल्या दीड वर्षांपासून हा प्रकार सुरू असून आता आपल्या रकमांसाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे.
शालार्थमधून शिक्षकांचे वेतन अदा केले जाते. त्यामुळे त्यांचा भविष्य निर्वाह निधी, व्यावसाय कर, जिल्हा परिषद गट विमा आदी रकमा आॅनलाईन बिलात कपात केल्या जातात. मात्र, ही रक्कम प्रत्यक्ष त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून दर महिन्याला कपातीचे शेड्यूल जिल्हा परिषदेकडे पाठविणे आवश्यक असते. नेमके हेच काम पंचायत समितीस्तरावरून झालेले नाही. जिल्ह्यातील सोळाही पंचायत समित्यांकडून हा ढिसाळपणा घडलेला आहे. आॅगस्ट २०१५ पासून शिक्षकांचे वेतन आणि कपाती शालार्थमधून आॅनलाईन केले जात आहे. मात्र, कपातीचे शेड्यूल पंचायत समिती स्तरावरून नियमित पाठविले गेले नाही. त्यामुळे आॅगस्ट २०१५ ते एप्रिल २०१७ या दीड वर्षांच्या कालावधीतील कपातीच्या रकमा शिक्षकांच्या खात्यात जमा होऊ शकलेल्या नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने पाठपुरावा केल्यानंतर आता शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे. आपल्या कपातीचे किती महिन्यांचे शेड्यूल बाकी आहे, याची चौकशी शिक्षकांनी सुरू केली आहे. शिक्षकांनी स्वत:चे नुकसान टाळण्यासाठी शेड्यूलबाबत संबंधित पंचायत समितीस्तरावर पाठपुरावा करण्याचे आवाहन शिक्षक सेनेने केले आहे.