यंदा कमी पटाच्या शाळांवर गंडातर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 09:34 PM2019-04-29T21:34:04+5:302019-04-29T21:34:25+5:30
गेल्या तीन वर्षांपासून टळत चाललेले ‘शाळा बंद’चे संकट यंदा अटळ आहे. जिल्ह्यातील कमी पटाच्या शाळा बंद करण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण समितीत चर्चा झाली असून येत्या दोन दिवसात शाळांच्या संख्येवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या तीन वर्षांपासून टळत चाललेले ‘शाळा बंद’चे संकट यंदा अटळ आहे. जिल्ह्यातील कमी पटाच्या शाळा बंद करण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण समितीत चर्चा झाली असून येत्या दोन दिवसात शाळांच्या संख्येवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
२० पेक्षा कमी पट असताना संचमान्यतेनुसार शिक्षकाची नेमणूकच करता येत नाही. तरी जिल्ह्यात अशा अनेक शाळांमध्ये शिक्षक कार्यरत आहेत. तर अनेक दुर्गम गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकच उपलब्ध नाहीत. त्यातूनच तीन वर्षांपूर्वी कमी पटाच्या शाळा बंद करण्याचे फर्मान जिल्हा परिषदेत धडकले होते. आता २०१९-२० या शैक्षणिक सत्रापासून २० नाही पण १० पेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करण्याबाबत शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिक्षण समितीत याबाबत अनौपचारिक चर्चाही झाली. कमी पटाच्या शाळांची आकडेवारी गोळा करणे, त्या भागातील दुसऱ्या शाळेची स्थिती तपासणे आदींबाबत सध्या विचार सुरू आहे. येत्या दोन दिवसात अंतिम आकडेवारीसह याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
१०० शाळा घटणार
जिल्हा परिषदेच्या २ हजारांपेक्षा अधिक शाळा आहेत. यातील कमी पटाच्या शाळांची मोजदाद अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार, सुमारे १०० शाळांचे इतरत्र समायोजन केले जाण्याची शक्यता शिक्षण समितीच्या एका सदस्याने वर्तविली. अशा शाळेतील विद्यार्थ्यांना परिसरातीलच अनुदानित संस्थेच्या शाळेत समायोजित केले जाणार आहे. तर शिक्षकांना जिल्हा परिषदेच्याच इतर शाळेत बदली दिली जाणार आहे.