यंदा कपाशीचा पेरा घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 10:09 PM2018-06-02T22:09:23+5:302018-06-02T22:09:23+5:30
दरवर्षी मे-जून महिन्यात कपाशी बियाणे कंपन्यांचा धुमाकूळ सुरू असतो. मात्र गेल्या वर्षी बोंडअळीने कहर केल्याने यावर्षी तालुक्यात कपाशीचा पेरा घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच बियाणे कंपन्यांनीही जाहिरातीचा धुमधडाका सुरू केला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : दरवर्षी मे-जून महिन्यात कपाशी बियाणे कंपन्यांचा धुमाकूळ सुरू असतो. मात्र गेल्या वर्षी बोंडअळीने कहर केल्याने यावर्षी तालुक्यात कपाशीचा पेरा घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच बियाणे कंपन्यांनीही जाहिरातीचा धुमधडाका सुरू केला नाही.
उन्हाळ्यात कपाशी बियाणे कंपन्यांचा जाहिरातबाजीवर भर असतो. गावोगावी कंपन्यांची वाहने बियाण्यांचा प्रचार करतात. शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाचे आमिष दाखवून बियाण्यांची विक्री करतात. आपलेच बियाणे कसे सरस आहे, याबाबत सर्वच कंपन्या दावा करतात. प्रचारासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. अनेक ठिकाणी मोठमोठ्ठे बॅनर, र्होर्डिंग्ज लावले जातात. अनेक शेतकरी जाहिरातीला भुलून बियाण्यांची खरेदी करतात. मात्र गेल्या वर्षी याच बियाण्यांवर बोंडअळीने हल्ला केला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांचे संसारच उद्ध्वस्त झाले. त्यामुळे यावर्षी बियाणे कंपन्यांचा प्रचाराचा धुमधडाका कुठेही दिसून येत नाही.
गेल्या वर्षी बोंडअळीने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यामुळे तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागले. बियाणे कंपन्यांवर संताप व्यक्त केला. शासनाने नुकसानभरपाईसाठी बियाणे कंपन्यांकडे बोट दाखविले. यामुळे यावर्षी सर्वच बियाणे कंपन्या धास्तावल्याचे दिसत आहे. परिणामी त्यांच्या प्रचारावर मरगळ आली आहे. बियाणे प्रचारासाठी ग्रामीण भागात गेल्यास मोठा अनर्थ घडण्याची धास्ती कंपन्यांच्या प्रतिनिधींना वाटत आहे. यामुळे यावर्षी शहरासह ग्रामीण भागात कुठेही बियाणे कंपन्यांची वाहने प्रचार करताना दिसत नाही. दुसरीकडे शेतकरीही उदासीन आहे. अद्याप अनेकांनी बियाणे खरेदी केली नाही. तथापि येत्या काही दिवसात बियाणे खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे.
सोयाबीनचा पेरा वाढणार
गेल्यावर्षी कपाशीने दगा दिल्याने यावर्षी कपाशीचा पेरा घटणार असल्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली. यामुळे तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीचा नाद सोडून दिला आहे. नगदी पीक म्हणून आता सोयाबीनला प्राधान्य दिले जात आहे.