यंदा शिक्षकांच्या बदल्या होणार मोबाईल ॲपवरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 03:08 PM2022-01-16T15:08:42+5:302022-01-16T18:51:15+5:30
बदली प्रक्रिया मोबाइल ॲपवरून होणार असल्याने हजारो शिक्षकांचा त्रास वाचणार आहे. बदलीसाठी या ॲपवरच अर्ज सोप्या पद्धतीने भरता येणार आहेत. याशिवाय विविध संवर्गातील शिक्षकांची यादी, अवघड गावांची यादी, रिक्त पदांची यादी या ॲपवरच सर्वांना पाहता येणार आहे.
अविनाश साबापुरे
यवतमाळ : कोरोनामुळे दोन वर्षांपासून सतत टळत असलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या यंदा कोणत्याही परिस्थितीत होणारच याबाबत अभ्यासगटाच्या बैठकीत सर्व शिक्षक संघटनांसह अधिकाऱ्यांचे एकमत झाले. विशेष म्हणजे ऑनलाईन बदल्या शंभर टक्के पारदर्शक होण्यासाठी मोबाइल ॲप विकसित केले जाणार आहे. बदलीचा अर्ज भरण्यापासून इतर सर्व प्रक्रिया या ॲपद्वारेच पार पाडली जाणार आहे.
बदल्या कशा कराव्या, या प्रक्रियेत कोणत्या सुधारणा कराव्या याकरिता शासनाने मागील वर्षीच पुण्याचे सीईओ आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वात पाच सीईओंचा अभ्यासगट नेमला होता. या अभ्यास गटाने विविध राज्यांतील प्रक्रियेचा अभ्यास करून तसेच महाराष्ट्रातील शिक्षक नेत्यांशी चर्चा करून शासनाला बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच राबविण्याची शिफारस केली आहे. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन शैक्षणिक सत्रांत बदली प्रक्रिया रखडली.
दरम्यान, यंदा बदल्या करण्यासंदर्भात अभ्यास गटाने शुक्रवारी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. त्यात बदलीविषयक संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली. त्यानुसार यावर्षी कोणत्याही परिस्थितीत ३१ मेपूर्वी बदल्यांचे आदेश निर्गमित होतील. पहिल्या संवर्गाच्या बदल्या झाल्यानंतर पुढील संवर्गाच्या बदल्या टप्प्याटप्प्याने केल्या जातील. बदलीची संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया प्रत्येक शिक्षकाला आपल्या मोबाइलवरच हाताळता यावी याकरिता मोबाइल ॲप विकसित केले जाणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षक प्राथमिक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर काठोळे, गोविंद उगले, संभाजी थोरात, काळू बोरसे पाटील, देवीदास बसोदे, चिंतामण वेखंडे, राजेश सुर्वे, साजिद अहमद, संजय जाधव, उमेश बोदे, श्यामराव जवंजाळ, सचिन ओंबासे आदींनी विविध मुद्दे यावेळी मांडले.
शिक्षकांची डोकेदुखी संपणार
बदली प्रक्रिया मोबाइल ॲपवरून होणार असल्याने हजारो शिक्षकांचा त्रास वाचणार आहे. बदलीसाठी या ॲपवरच अर्ज सोप्या पद्धतीने भरता येणार आहेत. याशिवाय विविध संवर्गातील शिक्षकांची यादी, अवघड गावांची यादी, रिक्त पदांची यादी या ॲपवरच सर्वांना पाहता येणार आहे. त्यासंबंधीच्या सॉफ्टवेअरचे काम अंतिम टप्प्यात असून, फेब्रुवारीच्या सुरुवातीला हे ॲप रेडी होण्याची शक्यता आहे. तर मार्चमध्ये प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, मोबाइल ॲपवरील प्रक्रिया आधी कोणत्या तरी एका जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबवून नंतरच त्याचा वापर राज्यभर केला जावा, अशी सूचना शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर काठोळे यांनी केली आहे.