येळाबारा मंदिरात भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:30 PM2018-08-12T22:30:48+5:302018-08-12T22:31:11+5:30
घाटंजी येथून अवघ्या दोन मैलावर असलेले येळाबारा गाव. प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर असल्याने ठिकठिकाणचे भाविक आणि पर्यटकांचा लोंढा आपसुकच या गावाकडे वळतो. विशेष म्हणजे, सुस्थितीत हे मंदिर उभे आहे.
चंद्रमणी कवाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
येळाबारा : घाटंजी येथून अवघ्या दोन मैलावर असलेले येळाबारा गाव. प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर असल्याने ठिकठिकाणचे भाविक आणि पर्यटकांचा लोंढा आपसुकच या गावाकडे वळतो. विशेष म्हणजे, सुस्थितीत हे मंदिर उभे आहे.
वाघाडी नदीच्या तीरावर वसलेल्या या मंदिराच्या सभोवताल हिरवीगार वृक्षवेली आहे. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. मंदिरात जाण्यासाठी पक्का रस्ता असून तो यवतमाळ-घाटंजी रोडला जोडला गेला आहे. सध्या पुरातत्व विभागाने हे मंदिर आपल्या अखत्यारित घेतले आहे. याच विभागाचा एक कर्मचारी त्याची देखरेख करतो आहे.
श्रावण महिन्यात शिव मंदिरात लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हे मंदिर पूर्णत: दगडी चिऱ्यांनी बांधलेले आहे. मंदिराच्या दर्शनी भागात नंदीबैल ऐटीत बसून आहे, तर गाभाºयात शिवलिंग आहे. गाभाºयातून भुयारी मार्ग असल्याचे जुने जाणकार सांगतात. परंतु आता तो भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे. या मंदिराच्या पूर्वेकडून गवानखडी, तर पश्चिमेकडून वाघाडी नदी वाहात आहे. हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
बारा मारोतीचे शीव जोडलेले गाव
येळाबारा गावची ओळख शिवेने होते. बारा मारोतीच्या शीव या गावाला जोडल्या असल्याचे सांगितले जाते. यावरूनच या गावाचे नाव येळाबारा पडले असल्याचे जुने जाणकार सांगतात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी याठिकाणी भाविकांची गर्दी असते.