अवैध सावकाराच्या उमरखेड येथील प्रतिष्ठानावर धाड

By Admin | Published: September 16, 2015 03:06 AM2015-09-16T03:06:48+5:302015-09-16T03:06:48+5:30

गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा उमरखेड परिसरात अवैध सावकारीला उधाण आले आहे.

Yield on the foundation of illegal lenders at Umarkhed | अवैध सावकाराच्या उमरखेड येथील प्रतिष्ठानावर धाड

अवैध सावकाराच्या उमरखेड येथील प्रतिष्ठानावर धाड

googlenewsNext

शेतकऱ्याची फसवणूक : सहायक निबंधकांची कारवाई
उमरखेड : गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा उमरखेड परिसरात अवैध सावकारीला उधाण आले आहे. याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत मंगळवारी दुपारच्या सुमारास येथील सराफा लाईन परिसरातील वर्मा ज्वेलर्स नामक अवैध सावकाराच्या प्रतिष्ठांनावर सहकार विभागाने पोलीस बंदोबस्तात अचानक धाड मारली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून, अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
उमरखेड येथील सुभाष कदम यांच्या लेखी तक्रारीवरून ही कारवाई सहायक निबंधक उमरखेड कार्यालयाने केली. अवैध सावकारीबाबत दीपक राधेशाम वर्मा, गोपाल माणिकचंद वर्मा, चंदू राजाराम वर्मा यांच्या मालकीच्या शहरातील सराफा लाईनमधील वर्मा ज्वेलर्स या दुकानावर धाड टाकण्यात आली. सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. मालमत्तेसंबंधी कागदपत्रे जप्त करण्यात आली. तक्रारकर्र्ते सुभाष राजाराम कदम यांना मरसूळ गावातील दादाराव बेडके यांची शेती विकत घ्यावयाची होती. त्यासाठी त्यांना काही पैसे कमी पडत होते. या पैशाची पूर्तता करण्यासाठी वर्मा ज्वेलर्स या प्रतिष्ठानमध्ये सोने विक्री करण्यासाठी सुभाष कदम गेले होते. यावेळी सोने विकत न घेता गहाण ठेऊन तुला मी पैसे देतो आणि काही पैसे कमी पडत असल्यास ते देखील देतो. परंतु ती शेती माझ्या नावावर कर, पैसे परत दिल्यानंतर शेती तुझ्या नावे करतो अशा प्रकारचे आमीष दीपक राधेशाम वर्मा यांनी कदम यांना दाखवून शेती स्वत:च्या नावे करून घेतली.
दरम्यान सुभाष कदम यांनी आटापिटा करून वर्मा यांचे संपूर्ण नऊ लाख रुपये परत केले. परंतु वर्मा यांनी कदम यांना नऊ लाख रुपये हे व्याजच होते, मुळ रक्कम तुझ्याकडे अद्यापही कायम असल्याचे म्हटले. त्यामुळे आता तू १० लाख रुपये एकर प्रमाणे पाच एकरचे ५० लाख रुपये दिल्यासच शेती तुझ्या नावे करतो असे सांगितले.
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे सुभाष कदम यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी सविस्तर तक्रार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात केली. या तक्रारीची दखल उमरखेड येथील सहाय्यक निबंधक सुनील भालेराव, आर्णीचे सहाय्यक निबंधक माधव अबीलव, सहकार अधिकारी ए.डी. भागानवरे, ओ.एम. वदुरकर, एस.एस. पिपरखेडे, एस.एस. थोरात, एस.एम. कंठ, कृषी बाजार समितीचे निरिक्षक अ.द. जगताप, यु.जी. काळे, पोलीस उपनिरीक्षक मनोज मानकर यांनी वर्मा ज्वेलर्सवर धाड मारली.
या धाडीत वर्मा कुटुंबियांच्या नावे असलेल्या नांदेड, हदगाव, उमरखेड व इतर ठिकाणच्या मालमत्तेचे दस्ताऐवज जप्त करण्यात आले. वर्मा कुटुंबीयांकडून इतर शेतकऱ्यांचीही फसवणूक झाल्याची शक्यता फेटाळता येत नाही. त्यानुषंगानेही सहकार विभागाकडून तपास सुरू आहे. सहकार विभागाकडून उमरखेड शहरात प्रथमच अशा प्रकारची कारवाई करण्यात आल्याने अवैध सावकारांमध्ये खळबळ उडाली आहे. तालुक्यात व शहरात अवैध सावकारी करणारे असतील तर त्यासंदर्भात लेखी तक्रार सहायक निबंधक सहकारी संस्था उमरखेड यांच्याकडे करण्याचे आवाहन सुनील भालेराव यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Yield on the foundation of illegal lenders at Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.