लोकमत सखी मंचतर्फे योग सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 09:22 PM2019-07-02T21:22:01+5:302019-07-02T21:22:15+5:30
लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंच यवतमाळच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग सप्ताह राबविण्यात आला. यामध्ये सप्रात्यक्षिक मार्गदर्शन करून सुदृढ आरोग्याच्या टिप्स देण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंच यवतमाळच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग सप्ताह राबविण्यात आला. यामध्ये सप्रात्यक्षिक मार्गदर्शन करून सुदृढ आरोग्याच्या टिप्स देण्यात आल्या.
महिलांसाठी आयोजित या सप्ताहात मुद्रा विशेषज्ज्ञ तथा योग-प्राणायाम प्रशिक्षक ज्ञानेश्वर सुरजुसे यांनी तत्त्वमुद्रा, पंचप्राणमुद्रा, रोगविशेष मुद्रा, व्यक्तिमत्व विकास मुद्रा याची सखोल माहिती देत प्रात्यक्षिक करून घेतले. शिवाय त्या-त्या मुद्रा प्रभावी करण्यासाठी प्राणायामाचा उपयोग करून चक्रसाधनांचे धडे दिले. पंचतत्त्व, पंचप्राण आणि सप्तचक्र याचे संतुलन साधल्यास भविष्यात गंभीर आजार होणार नाही. काही आजारांवर तत्काळ उपचार शक्य आहे, असे ज्ञानेश्वर सुरजुसे यांनी यावेळी सांगितले. तणाव व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास, निरामय जीवन जगण्याची इत्थंभूत मिमांसा, प्राचीन ग्रंथ घेरंडसंहितेवर आधारित मुद्राशास्त्र हे आजच्या अवस्थेत अत्यंत प्रभावी उपचार आहे हे त्यांनी सप्रमाण पटवून दिले.
लोकमत सखी मंच यवतमाळ स्टार विभाग प्रतिनिधी अलका राऊत यांना ओळखपत्र आणि गिफ्ट तर, ज्ञानेश्वर सुरजुसे यांना लोकमत सखी मंचतर्फे स्मृतिचिन्ह देऊन लोकमत सखी मंच जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.