तुम्ही फेडू शकत नाही, तुम्हाला कर्ज मिळत नाही!
By Admin | Published: May 26, 2017 01:14 AM2017-05-26T01:14:10+5:302017-05-26T01:14:10+5:30
मुद्रा लोनसाठी हेलपाटे : आत्महत्याग्रस्त शेतकरीपुत्र जिल्हाकचेरी, बँक आणि पालकमंत्र्यांच्या उंबरठ्यावर,
मुद्रा लोनसाठी हेलपाटे : आत्महत्याग्रस्त शेतकरीपुत्र जिल्हाकचेरी, बँक आणि पालकमंत्र्यांच्या उंबरठ्यावर, तरीही निराशा
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तारण नको, गॅरंटर नको.. या कर्ज घ्या आणि सक्षम व्हा, असे सांगत सरकारने तरुणांसाठी मुद्रा लोन योजना आणली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलगा याच कर्जासाठी गेल्या दोन महिन्यांपासून बँक, जिल्हाधिकारी, पंचायत समिती आणि सरतेशेवटी पालकमंत्र्यांचा उंबरठा झिजवून आला. तरी त्याला कर्ज मिळाले नाही. मिळाले ते अकल्पित उत्तर... ‘तुम्ही कर्ज फेडू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही!’
लोभसवाणे नाव घेऊन जाहीर केल्या जाणाऱ्या सरकारी योजनांची जिल्ह्यातील यंत्रणा कशी वाट लावतेय, त्याचे हे मासलेवाईक उदाहरण. यवतमाळ तालुक्यातील कामठवाडा गावातील शेतकरी रामधन बालचंद्र चव्हाण या तीन एकराच्या कास्तकाराने २६ आॅगस्ट २०१५ रोजी आत्महत्या केली. वृत्तपत्रातून बातम्या झळकण्यापलिकडे समाजाने या आत्महत्येची दखल घेतली नाही. पण तीन एकरावर रामधन यांच्या तीन मुलांचा संसार अर्धपोटी जगू लागला. सोबतीला वडलांच्या हातचे कर्जही होतेच. दोन वर्ष झाले, कुठूनच मदत नाही. मनोज, गणेश आणि तुकाराम ही मुले लोकांचे बैल चारून उदरनिर्वाह भागवित आहेत.
गरिबीतून बाहेर पडण्यासाठी मनोज चव्हाण याने मुद्रा लोनसाठी अर्ज केला. सातवीपर्यंत शिकलेल्या मनोजला किराणा दुकान लावायचे आहे. पण अकोलाबाजारच्या बँकेकडून प्रतिसाद मिळाला नाही. महिनाभर वाट पाहिल्यावर तो १८ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयात आला. त्याची व्यथा ऐकल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला पुन्हा बँक व्यवस्थापकाकडे पाठविले. १९ एप्रिलला मनोज बँकेत गेला. पण जिल्हाधिकाऱ्यांचा संदर्भ दिल्यावरही व्यवस्थापक म्हणाले, तुम्ही कर्ज फेडू शकत नाही, तुमच्या गावात किराणा दुकान चालत नाही, मग कर्ज कसे मिळणार तुम्हाला? असे करा, तुम्ही पंचायत समितीत कृषी विभागात जा... अशी बोळवण झाल्यावर मनोजने उसनवारी करून जिल्हाधिकारी कार्यालयात पाच वेळा चक्कर मारली. पण जिल्हाधिकाऱ्यांची भेट मिळू शकली नाही. शेवटी गुरूवारी तो यवतमाळ पंचायत समितीत पोहोचला. पण अधिकारी म्हणाले, आमच्याकडे तर काहीच नाही बावा तुमच्यासाठी!
मुद्रा लोनसाठी हताश झालेला मनोज चव्हाण पडलेली मुद्रा घेऊन पालकमंत्र्यांच्या दारावर गेला. त्यांचीही भेट घडू शकली नाही. शेवटी वडिलांच्या आत्महत्येच्या बातमीचे कात्रण, त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र, पोलिसांचा पंचनामा, बँकेला दिलेला अर्ज, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदन अशा कागदपत्रांचा धांडोळा पालकमंत्र्यांच्या उंबरठ्यावर ठेवून तो कामठवाड्याला परतला. तरुणांना स्वयंरोजगारातून सक्षम करण्यासाठी मुद्रा लोन दिले जाते. विना तारण, विना गॅरंटर मिळणारे मुद्रा लोन शेतकऱ्यांच्या मुलांना मात्र नाकारले जात असल्याचे वास्तव या प्रकरणातून उघड झाले.
नेत्यांच्या निकटवर्तीयांनाच कर्जाचा लाभ
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गाजावाजा करून सुरू केलेली मुद्रा लोन योजना सामान्य नागरिकांपर्यंत सत्ताधारी नेत्यांनी बँका मॅनेज करून पोहचूच दिली नाही. त्यामुळे जिल्ह्यात मुद्रा लोनचा डाटा कुणाकडेच उपलब्ध नाही. बँकाही तो गुलदस्त्यातच ठेवण्यात धन्यता मानत आहे. या योजनेचा खरा लाभ हा सत्ताधारी नेत्यांच्या निकटवर्तीयांनाच मिळाला. काहींनी तर आपल्या येथे राबणाऱ्या कामगारांच्या नावावर मुद्रा लोन उचलून स्वत:चा हडपले.
२०० रुपये उसने घेऊन आलो यवतमाळले. तीन भाऊ तीन एकरात कसे जगत असन आमी? येच्याकून त्येच्याकडं अन् त्येच्याकून येच्याकडं चकरा मारत हावो. कोनीतरी आमचंवालं ऐका राजेहो. आमचा बाप गेला, आता आमी बी थ्याच रस्त्यानं जाचं होय का?
- मनोज रामधन चव्हाण, कामठवाडा ता. यवतमाळ