तुम्ही जगा की मरा, पण धान्यवाटप करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:51 AM2021-04-30T04:51:38+5:302021-04-30T04:51:38+5:30
शहरातून आता ग्रामीण भागातील घराघरांत कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहे. अशा स्थितीत शासन व प्रशासनाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य ...
शहरातून आता ग्रामीण भागातील घराघरांत कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहे. अशा स्थितीत शासन व प्रशासनाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य पार पाडणारी यंत्रणा म्हणजे गावागावांतील प्रत्येक घरातील लोकांपर्यंत धान्य पोहचविणारी अन्न व नागरी पुरवठा यंत्रणा होय. या यंत्रणेच्या माध्यमातून घराघरांतील प्रत्येकाला स्वस्त भावात धान्य घरपोच देण्यात येते. या यंत्रणेमध्ये पुरवठा अधिकारी, पुरवठा कर्मचारी, गोडाऊन किपर, हमाल, धान्य पुरवठा ठेकेदार, ट्रकचालक-मालक ते रास्त भाव धान्य दुकानदार ही साखळी गावातील प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी अन्नधान्य वितरण करीत असते. परंतु, कोरोनाच्या महामारीत हीच अन्नधान्य वितरण करणारी साखळी अडचणीत सापडली आहे. त्यांच्या जीवनाची हमी राहिली नाही. रास्त भाव धान्य दुकानदारांना तर जगा की मरा, पण धान्य वितरण करा, असा एक प्रकारे अलिखित आदेशच दिला गेला आहे. त्यामुळे रास्त भाव दुकानदार अडचणीत सापडले आहे.
कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून संपूर्ण राज्यात संचारबंदी आहे. मात्र, कुणी उपाशी राहू नये म्हणून महिन्यातून दोनदा धान्य पुरवठा करण्याचे आदेश आहे. मात्र, दुकानदारांना कोणतीही सुविधा नाही. गावागावांत कोरोना रुग्ण आढळत असताना, रास्त भाव धान्य दुकानदारांना ई-पॉस मशीनच्या साहाय्याने धान्य पुरवठा करावा लागतो. त्यांच्या संपर्कात गावातील प्रत्येक कार्डधारक येतो. त्यात एखादा जर कोरोना संक्रमित असेल, तर संपूर्ण गाव कोरोना संक्रमित झाल्याशिवाय राहणार नाही. धान्य दुकानदार आपला जीव धोक्यात घालून धान्य वितरण करीत असल्याने तालुक्यातील अनेक दुकानदारच कोरोना संक्रमित झाले आहेत.
बॉक्स
सुरक्षेसाठी ठोस पावले उचला
तालुक्यातील महाळुंगी येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यांचे कुटुंब उघड्यावर आले. सध्या तालुक्यातील १० ते १२ दुकानदार कोरोनाशी सामना करीत आहेत. अशा अवस्थेत धान्य वितरण करणे जोखमीचे आहे. दुकानदारांच्या सुरक्षेकरिता काही ठोस पावले उचलावीत, असा सूर रास्त भाव धान्य दुकानदारांच्या गोटातून व्यक्त होत आहे.