तुम्हीच आमचे मालक, म्हणून भेटीसाठी आलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:54 PM2019-08-05T23:54:14+5:302019-08-05T23:55:18+5:30
तुम्हीच आमचे मालक आहात. तुम्हीच राजे. म्हणूनच आम्ही काम केले हे तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या दर्शनाकरिता ही महाजनादेश यात्रा आहे. जनतेत जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढली आहे, अशी कृतज्ञ भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : तुम्हीच आमचे मालक आहात. तुम्हीच राजे. म्हणूनच आम्ही काम केले हे तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या दर्शनाकरिता ही महाजनादेश यात्रा आहे. जनतेत जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढली आहे, अशी कृतज्ञ भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
सोमवारी सायंकाळी राळेगाव येथे जाहीर सभेत ते बोलत होते. महाराष्ट्र पालथा घालण्यासाठी निघालेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सोमवारी वडकी-खैरी मार्गे जिल्ह्यात दाखल झाली. राळेगाव आणि यवतमाळ अशा दोन ठिकाणी जाहीर सभा झाल्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या मतदारसंघातील विविध विकास कामांवर शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले. राज्यातील ५० हजार आदिवासी मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आला. तर एक लाख मुलांना आश्रमशाळांमधून उत्तम शिक्षण दिले जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी या सरकारने ५० हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे. शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ पोहोचेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविली जाणार आहे.
यावेळी आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके म्हणाले, राळेगाव मतदारसंघातील विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी नेहमीच सहकार्य केले. बेंबळा प्रकल्प प्राधान्याने पूर्णत्वास जावा, शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठीच मतदारसंघात महामार्ग देण्यात आला. रोजगार वाढविण्यासाठी सूतगिरणीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे.
यवतमाळ येथील जाहीर सभेत मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, ना. संजय कुंटे, पालकमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार प्रवीण पोटे, आमदार निलय नाईक, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, आमदार राजू तोडसाम, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, वणी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे उपस्थित होते. राळेगावच्या सभेचे संचालन भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब कविश्वर यांनी केले.
विरोधकांना मुख्यमंत्र्यांचे चिमटे
जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरही शरसंधान साधले. भाषण करताना मी वारंवार पाणी पितो, कारण मला काँग्रेसला पाणी पाजायचे आहे. काँग्रेसला साधा स्वत:चा अध्यक्षही निवडता येत नाही. त्यांनी आता मुंबईतील गर्दीत चिठ्ठी टाकून अध्यक्ष निवडावा, असे म्हणतानाच त्यांनी राष्ट्रवादीलाही लक्ष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस आता फक्त पवार कुटुंबाचीच उरली आहे. २२ विरोधी पक्षांचे लोक इव्हीएम विरोधात एकत्र आले आहे. मात्र त्यांना जनतेच्या प्रश्नांचे देणे-घेणे नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.