तुम्ही घ्या उपचार, बिल भरणार सरकार, ११ महिन्यांत ६० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 18:22 IST2024-12-13T18:20:53+5:302024-12-13T18:22:51+5:30
महात्मा फुले जनआरोग्य योजना : पांढरे रेशन कार्ड अपडेट बंधनकारक

You take treatment, the government will pay the bill, 60 crores in 11 months.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पूर्वी केशरी व पिवळ्या रेशनकार्डधारकांना योजनेचा लाभ देण्यात येत होता. आता पांढरे कार्ड असणाऱ्यांना लाभ देण्यात येत असून, दि. १ जानेवारी ते ११ डिसेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत १३ हजार ३३४ लाभार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. त्यावर झालेल्या खर्चाचा एकूण ६० कोटी ३१ लाख ९१ हजार ८४० रुपयांचा भरणा शासनाने केला आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा नाही. जिल्ह्यात उपचारासाठी रुग्णालयांची संख्याही वाढल्याने ती आता ३३ वर पोहोचली आहे. ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि खासगी रुग्णालयातही रुग्णांना उपचार घेता येतात. योजनेंतर्गत दीड लाखांच्या खर्चाची मर्यादा पाच लाख करण्यात आली आहे. २१,९३८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
११ महिन्यांत २१ हजार ९३८ शस्त्रक्रिया
मागील अकरा महिन्यांत १३,३३४ लाभार्थ्यांवर उपचार करण्यात आले. यात शस्त्रक्रियांची संख्या २१,९३८ आहे. जिल्ह्यात खासगी, वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेता येतात. त्याचा फायदा गरजू रुग्णांना होत आहे.
६० कोटी मिळाले
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून १३ हजार ३३४ लाभार्थीवर उपचार करण्यात आले. त्यासाठी ६० कोटी ३१ लाख ९१ हजार ८४० रुपयांचा खर्च झाला. हा निधी शासनाने रुग्णालयाला वळता केला.
मोफत उपचारासाठी काय निकष?
या योजनेतून पूर्वी केशरी व पिवळ्या राशनकार्डधारकांवर उपचार करण्यात येत होते. आता पांढरे राशनकार्डधारकही लाभार्थी आहेत. मात्र, त्यासाठी पांढरे राशन कार्ड हे अपडेट असणे आवश्यक आहे.
काय आहे जनआरोग्य योजना?
- अनेकांकडे पैसे राहत नसल्याने त्यांना उपचार घेता येत नाही. उपचारापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू करण्यात आली.
- पांढरे शिधा कार्ड असणाऱ्यांनाही उपचारासाठी पात्र समजले जाते. दीड लाखाच्या खर्चाची मर्यादा वाढवून ती पाच लाख करण्यात आल्याने गरजूंना त्याचा फायदा होत आहे.
"योजनेचा लाभ मिळण्यासाठी पांढरे राशन कार्ड ऑनलाइन अपडेट असणे आवश्यक आहे. ज्यांचे राशन कार्ड हे अपडेट नाही. अशा लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयातून अपडेट करून घ्यावे."
- सुरेंद्र हरपनवार, जिल्हा समन्वयक