यवतमाळच्या ग्रामीण भागातील राणीची गगन भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:43 PM2018-03-08T12:43:47+5:302018-03-08T12:43:53+5:30
पाचवीनंतर नववीपर्यंत तिचा कधीच पहिला नंबर आला नाही. नववीचा निकाल लागल्यानंतर तर भावाने गुण कमी पडले म्हणून चक्क तिची मार्कसीट चोळामोळा करुन फेकून दिली. नेमका तोच दिवस राणीसाठी प्रेरणादायी ठरला.
हरिओम बघेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : परसोडा येथील राणी कोल्हे पहिली ते चौथीपर्यंत आर्णीतील तत्कालीन जिल्हा परिषद शाळेत शिकली. नंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण महन्त दत्तराम भारती कन्या शाळेत झाले. त्यावेळी परसोडा ते आर्णीपर्यंत धड रस्ता नव्हता. तरीही कधी घरून ये-जा करून, तर कधी आर्णीत भाड्याने रूम घेऊन तिने शिक्षण पूर्ण केले.
पाचवीनंतर नववीपर्यंत तिचा कधीच पहिला नंबर आला नाही. नववीचा निकाल लागल्यानंतर तर भावाने गुण कमी पडले म्हणून चक्क तिची मार्कसीट चोळामोळा करुन फेकून दिली. नेमका तोच दिवस राणीसाठी प्रेरणादायी ठरला.
त्या दिवशी तिने आपण नंबर आणूनच दाखवायचा, या जिद्दीने अभ्यासाचा निर्णय घेतला अन् दहावीत थेट ७३ टक्के गुण घेतले. तिचे वडील दहावी, तर आई सातवीपर्यंत शिकलेली. मात्र मुलांनी खूप शिकावे, अशी त्यांची इच्छा. त्यामुळेच राणीने अकरावीसाठी भारती महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे बारावी ८0 टक्के गुणांनी उत्तीर्ण केली. नंतर शिक्षण घेण्याऐवजी डीएड करून नोकरी करावी, वडिलांना हातभार लावावा, हा विचार तिच्या मनात घोळू लागला. त्यामुळे तिने डीएड केले. मात्र नोकरीच काही जमलं नाही. मात्र तिने हिम्मत कायम ठेवत बीएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पहिल्यावर्षी तिने एका कॉन्हेन्टमध्ये पार्टी टाईम नोकरी केली. त्यातून मिळणाऱ्या पैशातून शिक्षणासाठी मदत झाली.
बीएससी झाल्यानंतर तिचा अमरावती विद्यापीठात एमएससी बॉटनीसाठी नंबर लागला. मात्र वसतिगृहात नंबर लागला तरच तिचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार होते. तिला नशीबाने साथ दिली अन् तिचा वसतिगृहात नंबर लागला. जिद्दीने अभ्यास करून तिने एमएससीमध्ये विद्यापीठातून सुवर्णपदक पटकाविले. आता यावरच न थांबता पुढे पीएचडी तथा नेट, सेट परीक्षा देण्याची तयारी तिने सुरू केली. प्राध्यापक व्हायचेच, या ध्येयाते ती झपाटली आहे.