भरचौकात तरुणाला मारहाण, अपमान सहन न झाल्याने 'त्याने' केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 05:53 PM2022-01-04T17:53:20+5:302022-01-04T18:15:44+5:30
चारचौघात झालेल्या मारहाणीमुळे तो अत्यंत व्यथित झाला होता. हा अपमान सहन न झाल्याने त्याने विष घेऊन आत्महत्या केली.
यवतमाळ : कारण नसताना दोघांनी भरचौकात तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्याने तरुणाने विषाचा घोट घेवून आपली जीवनयात्रा संपविली. महागाव तालुक्यातील वाकोडी येथे मंगळवारी घडलेल्या या घटनेने समाजमन सुन्न झाले.
शिवानंद सिद्धेश्वरआप्पा कुरळे (३२) रा. वाकोडी असे मृत तरुणाचे नाव आहे. २ जानेवारी रोजी शिवानंद कुरळे हा कैलास टेकडी येथे दर्शनासाठी गेला होता. तेथून सायंकाळी वाकोडी गावात परत आला. त्यावेळी चौकात प्रेमराव भालगोराव गावंडे (३५) आणि राजेश भालगोराव गावंडे (४०) यांनी त्याच्याशी वाद घातला. या वादातच शिवानंदला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली.
शिवानंदचे वडील सिद्धेश्वरआप्पा कुरळे यांना या प्रकाराबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून शिवानंदची सुटका केली. मात्र चारचौघात झालेल्या मारहाणीमुळे शिवानंद अत्यंत व्यथित झाला होता. आता जगण्यात स्वारस्य उरले नाही, असे तो सर्वांना सांगत होता. दरम्यान मंगळवारी सकाळी शेतात जाण्याचे निमित्त करून तो घराबाहेर पडला. मात्र शेतात जावून त्याने विष प्राशन केले.
शिवानंद याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु तेथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रेमराव आणि राजेश भालगोराव गावंडे या दोघांविरुद्ध महागाव पोलिसांनी भादंवि कलम ३०६ नुसार गुन्हे दाखल केले.