लहान भाऊच ठरला मोठ्याचा काळ, क्षुल्लक कारणातून केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 05:03 PM2022-01-13T17:03:47+5:302022-01-13T17:15:11+5:30
मोठ्या भावाने आईकडे पैसे मागितल्याच्या कारणावरून दोन्ही भावात वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. संतापलेल्या लहान भावाने मोठ्या भावाच्या पोट, छाती व गळ्यावर चाकूने सपासप वार केले.
यवतमाळ : लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केली. ही घटना घाटी येथे मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे.
दीपक ज्योतिराम गेडाम (२५) रा. इंदिरा आवास, घाटी घाटंजी असे मृत मोठ्या भावाचे नाव आहे. दिलीप ज्योतिराम गेडाम (२२) असे आरोपी लहान भावाचे नाव आहे. मंगळवारी घाटंजी येथे आठवडी बाजार असतो. दीपक आणि दिलीपची आई बाजारात गेली होती. बाजारातच मोठा मुलगा दीपकने आईकडे पैशांची मागणी केली. बाजार आटोपल्यानंतर आई घरी परतल्यानंतर तिने हा प्रकार लहान मुलगा दिलीप याला सांगितला.
यानंतर घरी दीपक व दिलीप यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. संतापलेला लहान भाऊ दिलीपने मोठा भाऊ दीपकच्या पोट, छाती व गळ्यावर चाकूने सपासप वार केले. यात दीपक गंभीर जखमी झाला. त्याच्या आईने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दीपकचा मृत्यू झाला.
आरोपीला तत्काळ अटक
या प्रकारानंतर भीमराव गजानन कोवे यांनी तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी दिलीप गेडाम याच्याविरुद्ध भादंवि ३०२ कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला लगेच अटक केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे. बुधवारी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पोलीस निरीक्षक मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विलास सिडाम, जमादार राहुल खंडागळे, कॉन्स्टेबल विशाल वाढई आदी तपास करीत आहे.