अपंगत्वावर मात करत 'आनंद'ने खेचून आणले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 12:02 PM2021-11-03T12:02:24+5:302021-11-03T12:10:20+5:30

शिकवणीला जाताना झालेल्या गंभीर अपघातात आनंदच्या पाठीचे मणके तुटले. तो २२ दिवस कोमात राहिला आणि त्यानंतर वर्षभर बेडवर होता. अशा परिस्थितीतही त्याने निर्धार ढळू न देता जिद्दीच्या जोरावर एमटेकमध्ये ७० टक्के गुण मिळविले.

young man success story to got young MTech degree after a horrible accident | अपंगत्वावर मात करत 'आनंद'ने खेचून आणले यश

अपंगत्वावर मात करत 'आनंद'ने खेचून आणले यश

googlenewsNext
ठळक मुद्दे२२ दिवस कोमात : अपंगत्वावर मात करीत अभियांत्रिकीची पदव्युत्तर परीक्षा पास

रूपेश उत्तरवार

यवतमाळ : जिद्द, चिकाटी आणि सातत्य असेल, तर जीवनात अशक्य असे काहीच नाही. त्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र करावी लागते. यानंतर यश खेचून आणता येते. यवतमाळच्या आनंद करंदीकर या विद्यार्थ्याने असेच अशक्य काम शक्य करून दाखविले.

आनंदचा शिकवणीला जाताना गंभीर अपघात झाला. त्यात त्याच्या पाठीचे मणके तुटले. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातानंतर तो २२ दिवस कोमात राहिला आणि वर्षभर बेडवर होता. आजही त्याला चालता येत नाही. अशा परिस्थितीत उच्चशिक्षणाचा ध्यास घेतलेल्या आनंदने एमटेकमध्ये ७० टक्के गुण मिळवीत नवा रेकॉर्ड केला. अपघातामुळे त्याला दीक्षांत समारंभाला जाता आले नाही. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी हा पुरस्कार सर्वांसमक्ष त्याच्या यवतमाळच्या घरी प्रदान केला. यावेळी विद्यार्थ्यांसह कुटुंबाच्या आनंंदाला पारावार राहिला नाही.

यवतमाळच्या सत्यनारायण लेआउटमध्ये वास्तव्याला असलेला आनंद पूर्वीपासूनच हुशार आहे. त्याचा पॉलीमध्ये नंबर लागला. कॉलेजला जाताना १९९९ मध्ये एका वाहनचालकाने आनंदच्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यात त्याच्या शरीरातील हाडांचा चुराडा झाला. आनंद कसाबसा वाचला; परंतु तो कोमात गेला होता. २२ दिवस कोमात असल्याने घरच्यांना प्रचंड चिंता होती. काेमातून बाहेर आल्यानंतर त्याला उठूनही बसता आले नाही. त्याचे अनेक ऑपरेशन झाले. वर्षभर तो बेडवरच खेळून होता. घरच्याने त्याची अपेक्षा सोडली होती.

मात्र, आनंद जिद्दी होता. त्याला पॉलीसह अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे होते. या गंभीर स्थितीत आनंदने पॉलीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी मिळवली. त्याला बीईमध्ये ६७ टक्के मिळाले. या शिक्षणावरच आनंद थांबला नाही. त्याला एमटेकची पदवी घ्यायची होती. या स्थितीत त्याने वर्धा येथील अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्याला ७० टक्के गुण मिळाले.

त्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर वर्धा येथे पदवीप्रदान करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या पदवीदान कार्यक्रमापूर्वी आनंदचा दुसरा अपघात झाला. यामुळे पदवी स्वीकारण्यासाठी त्याला जाता आले नाही. यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य राजकिशोर तुगनायक यांनी आनंदच्या घरी आई-वडिलांसमक्ष पदवी प्रदान केली. आनंदला पाण्यावर वीजनिर्मितीच्या प्रयोगात पुढील काळात काम करायचे आहे.

Web Title: young man success story to got young MTech degree after a horrible accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.