तरुणाई जाणून घेतेय वाघाची ‘चाल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 06:00 AM2020-03-14T06:00:00+5:302020-03-14T06:00:11+5:30
प्रामुख्याने परिसरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींना वाघाच्या संचाराची त्याचे अस्तित्व ओळखण्याची संपूर्ण माहिती पुरविली जात आहे. या कार्यशाळांमध्ये मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विराणी हे तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. यातील पहिली कार्यशाळा मोहदा येथे सरदार पटेल महाविद्यालयात पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : टिपेश्वर अभयारण्य म्हणजे सध्या सर्वाधिक वाघांचे संचारक्षेत्र बनले आहे. वाघांची संख्या वाढत असून परिसरत वन्यजीव-मानव संघर्षाच्या घटनाही वाढत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी आता या परिसरातील तरुण वाघाच्या जगण्याची, वागण्याची, वावरण्याची चालरीत समजून घेत आहेत. त्यासाठी वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया आणि जपान टायगर अँड एलिफंट फंड या संस्थांच्या सहाय्याने गावोगावी कार्यशाळा घेतल्या जात आहेत.
प्रामुख्याने परिसरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींना वाघाच्या संचाराची त्याचे अस्तित्व ओळखण्याची संपूर्ण माहिती पुरविली जात आहे. या कार्यशाळांमध्ये मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विराणी हे तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. यातील पहिली कार्यशाळा मोहदा येथे सरदार पटेल महाविद्यालयात पार पडली. त्यानंतर दुसरी कार्यशाळा पारवा येथे झाली. तर आता डॉ. विराणी स्वत: प्राणीशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे महाविद्यालयात होणार आहे. याशिवाय, वणी, झरी, मुकुटबन आदी गावांतील तरुणांनाही मार्गदर्शन केले जाणार आहे.
वन्यजीवांचे अस्तित्व कसे ओळखावे, वाघाचे केंद्रस्थान कोणते, मानव-वन्यजीव संघर्षाची कारणे, त्यावरील उपाययोजना आदींबाबत विद्यार्थी स्वयंस्फूर्त माहिती जाणून घेत आहेत. मोहदा येथील कार्यशाळेला महाविद्यालयाचे संचालक डॉ. राधेश्याम चौधरी, प्राचार्य गोरलेवार, प्रा. सूरज चौधरी, प्रा. इंगळे आदी उपस्थित होते.
वाघाशी अनेकदा आमना-सामना
टिपेश्वर परिसरातील अनेक विद्यार्थ्यांचा शाळा-महाविद्यालयात जाताना वाघाशी आमना-सामना झाला आहे. हे अनुभव विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत बोलून दाखविले.