एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 07:40 PM2018-03-21T19:40:32+5:302018-03-21T19:43:21+5:30
चंद्रपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती चिंताजनक
वणी (यवतमाळ) : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अल्पवयीन तरुणीवर चाकूहल्ला करीत तिला गंभीररित्या जखमी केले. वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडगाव (इजासन) या गावी मंगळवारी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. पोलिसांनी हल्लेखोर युवकाला अटक केली आहे.
हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले असून तिची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे सांगितले जाते. गोडगाव (इजासन) येथील ही १७ वर्षीय तरुणी अकराव्या वर्गात शिक्षण घेत आहे. घराशेजारीच राहणाऱ्या निलेश अशोक दोरखंडे (२२) याचे सदर युवतीशी एकतर्फी प्रेम जडले. निलेशच्या वडिलांचा गावात पानटपरीचा व्यवसाय आहे. निलेशने अनेकदा तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित तरुणी प्रत्येकवेळी त्याला नकार देत होती.
यादरम्यान, सदर तरुणी तिच्या मामाच्या मुलाशी मोबाईलवरून चॅटींग करीत असे. ही बाब निलेशला माहित पडली. तिच्याशी बोलण्यासाठी निलेश हा अधुनमधून तिच्या घरी जात होता. मंगळवारी दुपारी तो तिच्या घरी गेला. यावेळी पीडित तरुणीशिवाय घरी कोणीच नव्हते. ही संधी साधून निलेशने तिला पिण्यासाठी पाणी मागितले. त्यावर तरुणीने त्याला स्वत:च्या हाताने पाणी घेऊन पी, असा सल्ला दिला.
त्यानंतर निलेशने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिकार करत तरुणीने त्याला फटकारले. मामाच्या मुलाशी तु का बोलतेस, या मुद्यावर या दोघात चांगलीच खडाजंगी झाली. वाद वाढत गेला. या वादात संतापलेल्या निलेशने तरुणीवर धारदार चाकूने सपासप वार केले.
या हल्ल्यात पीडित तरुणीच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. हल्ल्यानंतर निलेशने घटनास्थळावरून पळ काढला. याचवेळी शेजारी राहत असलेल्या एका लहान मुलाने ही घटना पाहिली. त्याने लगेच धावत जाऊन मुलीच्या वडिलांना घटनेची माहिती दिली.
वडील धावत घरी पोहोचले, तेव्हा तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. तिला लगेच उपचारासाठी वणी येथील खासगी रूग्णालयात आणण्यात आले. मात्र गंभीर प्रकृती लक्षात घेता, खासगी रूग्णालयाने तिला चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जखमी युवतीला चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
हल्लेखोर युवकाला केले जेरबंद
यासंदर्भात वणी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गोडगाव (इजासन) येथे जाऊन आरोपी निलेश अशोक दोरखंडे याला हुडकून काढून अटक केली. त्याच्याविरूद्ध भादंवि ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.