बाभूळगावातील युवकाच्या खुनात तिघांंना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 09:30 PM2019-06-27T21:30:31+5:302019-06-27T21:30:53+5:30
पानठेल्याच्या जागेतून वाद घालत तिघांनी बाभूळगावातील बसस्थानकासमोर भर बाजारात युवकाचा खून केला. या गुन्ह्यातील तीनही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पानठेल्याच्या जागेतून वाद घालत तिघांनी बाभूळगावातील बसस्थानकासमोर भर बाजारात युवकाचा खून केला. या गुन्ह्यातील तीनही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
जाम्या उर्फ शेख जमीर शेख जब्बार, शाहरूख खाँ बाबा खाँ पठाण, गोलू उर्फ सलीम गफ्फार खाँ पठाण (तिघेही रा.नेहरूनगर, बाभूळगाव) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनी ११ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी १० वाजता गणेश दौलत मेश्राम (रा.कोपरा) याचा बाभूळगाव बसस्थानकासमोर धारदार शस्त्रांनी खून केला. गणेश मेश्राम व आरोपींमध्ये पानठेल्याच्या जागेवरून वाद होता. गणेश हा वडील दौलत मेश्राम यांच्यासोबत घटनेच्या दिवशी भाजीपाला खरेदीसाठी बाजारात आला होता. त्यावेळी आरोपी जाम्या याने लोखंडी पाईपने गणेशच्या डोक्यावर वार केले, तर शाहरूखने गणेशच्या पोटवर, छातीवर चाकूने वार केले. हा हल्ला होत असताना आरोपी गोलू याने ‘काट डालो सालों को, मार डालो’ असे जोरजोराने ओरडून हल्लेखोरांना प्रोत्साहन दिले. दौलत मेश्राम यांच्यासमोरच आरोपींनी त्यांचा मुलाचा खून केला. याप्रकरणी बाभूळगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक के.एल. सरोदे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. या खटल्यात प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश के.आर. पेटकर यांनी नऊ साक्षीदार तपासले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षदार दौलत गणपत मेश्राम रा.कोपरा, दुसरे प्रत्यक्षदर्शी चंद्रशेखर दिगांबर मेंढे रा.राणीअमरावती, शवविच्छेदन करणारे डॉ. रवींद्र ठाकरे, मंगेश नांदेकर, तपास अधिकारी किशोर सरोदे, एसडीपीओ पीयूष जगताप यांची साक्ष ग्राह्य मानून आरोपींना जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा देण्यात आली. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने सहायक सरकारी वकील विजय एस. तेलंग यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी प्रकाश रत्ने यांनी त्यांना सहकार्य केले. आरोपीच्या बाजूनी अॅड. ललित देशमुख, अॅड. राजेश साबळे, अॅड. इम्रान देशमुख यांनी युक्तिवाद केला.
व्यावसायिक जागेचा वाद
बाजारपेठेतच दुकान लावण्याच्या जागेचा वाद होता. गणेश मेश्राम याचा पानठेला होता. तर आरोपीचे चिकनचे दुकान होते. यातूनच ही घटना घडल्याचे तपासात निष्पन्न झाले.