पबजी गेमच्या नादापायी यवतमाळ जिल्ह्यात युवकाची गळफास लाऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 03:35 PM2020-06-25T15:35:31+5:302020-06-25T21:01:41+5:30
नेर तालुक्यातील पिंप्री मुखत्यारपूर येथे गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. तो पबजी गेमच्या नादी लागला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: नेर तालुक्यातील पिंप्री मुखत्यारपूर येथे ऑनलाईन पब्जी खेळाने एका युवकाचा बळी घेतला. सदर युवकाने गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास लाऊन आत्महत्या केली.
निखिल पुरुषोत्तम पिलेवान (२३) असे मृत युवकाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मोबाईलवर ऑनलाईन पब्जी गेम खेळत होता. या ऑनलाईन खेळामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले. त्यातूनच निखिलने गुरुवारी सकाळी राहत्या घरी गळफास लावला. यात त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याचे आई, वडील व भाऊ शेतात गेले होते. घरी निखिल एकटाच होता. एकटा असल्याची संधी साधून त्याने गळफास घेतल्याची माहिती त्याचा भाऊ मिथेश यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीतून दिली. निखिलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. ऑनलाईन खेळामुळे निखिलचा बळी गेल्याने ग्रामीण भागातही पब्जी गेम पोहोचल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.
सात महिन्यांपूर्वी पुणे येथून परतला
गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी निखिल पुणे येथून गावात परतला होता. त्याला पब्जी गेमचे वेड होते. दिवसातून १६-१६ तास तो ऑनलाईन पब्जी गेम खेळत होता. आई, वडील व मोठ्या भावाने त्याला कित्येकदा समजाविले. मात्र पब्जीमुळे त्याची मानसिकता बदलली होती. त्यातूनच त्याने गुरुवारी आत्महत्या केली. जिल्ह्यातील पब्जी गेमचा निखिल पहिला बळी ठरला आहे.