शौचालयासाठी युवक काँग्रेसचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:19 AM2017-07-25T01:19:06+5:302017-07-25T01:19:06+5:30
स्थानिक नेताजीनगर मधील महिलांनी वैयक्तीक शौचालय योजनेसाठी नगरपरिषदेकडे सात महिन्यापूर्वी अर्ज केले.
सात महिन्यांपूर्वी अर्ज : मुख्याधिकारी-आंदोलकांत शाब्दिक खडाजंगी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक नेताजीनगर मधील महिलांनी वैयक्तीक शौचालय योजनेसाठी नगरपरिषदेकडे सात महिन्यापूर्वी अर्ज केले. यावर पालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नसल्याने युवक काँग्रेसच्या नेतृत्वात सोमवारी दुपारी नगरपरिषदेवर टमरेल मोर्चा काढण्यात आला.
नेताजी नगरातील नागरिकांना शौचालय नसल्याने उघड्यावर जावे लागते. याच भागातील महिला उघड्यावर शौचास गेल्यानंतर काही समाजकंटकांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला. असे प्रकार येथे वारंवार घडत आहे. याला केवळ नगरपरिषद प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करून या भागातील महिलांनी मुलाबाळासह नगरपरिषदेवर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष विक्की राऊत, नगरसेवक अनिल देशमुख यांनी केले.
महिला व नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या दिला. यावेळी मुख्याधिकारी स्थायी समितीच्या बैठकीत बसून होते. आंदोलकांनी आक्रमक भुमिका घेतल्यानंतर मुख्याधिकारी बैठकीतून बाहेर आले. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षत आंदोलक गेले. येथे चर्चा सुरू असताना मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेवलेल टमरेल त्यांनी फेकून दिले. यावरून आंदोलकांनी पुन्हा ते टमरेल टेबलवर ठेवले. तेव्हा दोघांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. नंतर दोघांनी सामोपचारी भुमिका घेऊन निवेदन दिल्यानंतर आंदोलक माघारी परतले. यावेळी नगरसेवक दिशेन गोरकर, विशाल पावडे, वैशाली सवाई, शहजाद शहा, छोटू सवाई, शब्बीर खान, सिंकदर शहा, रितेश भरूड, कृष्णा पुसनाके, दत्ता हाडके, राजू मामीडवार आदी उपस्थित होते.