मराठा आरक्षणासाठी युवकाने प्राशन केले विष, उपोषण मंडपात खळबळ

By अविनाश साबापुरे | Published: September 12, 2023 03:36 PM2023-09-12T15:36:00+5:302023-09-12T15:37:57+5:30

मृत्यूशी झुंज सुरू, उमरखेडमध्ये आंदोलन पेटले

Youth consumes poison for Maratha reservation; chaos in the hunger strike pandal | मराठा आरक्षणासाठी युवकाने प्राशन केले विष, उपोषण मंडपात खळबळ

मराठा आरक्षणासाठी युवकाने प्राशन केले विष, उपोषण मंडपात खळबळ

googlenewsNext

उमरखेड (यवतमाळ) :मराठा आरक्षणासाठी आठवडाभरापासून येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. दरम्यान मंगळवारी अचानक एका युवकाने उपोषण मंडपात येऊन सर्वांपुढे विष प्राशन केले. त्यामुळे एकच तारांबळ उडाली. या युवकाला तातडीने यवतमाळ येथे हलविण्यात आले असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

अशोक देवराव जाधव (३५) रा. जेवली ता. उमरखेड असे विष प्राशन केलेल्या युवकाचे नाव आहे. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीहल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर उमरखेड शहरात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ५ सप्टेंबरपासून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. दररोज या उपोषणाला पाठिंबा वाढत असून तालुक्यातील गावागावातून मोर्चे या उपोषण मंडपापर्यंत आणले जात आहेत. 

मंगळवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२:१५ च्या सुमारास उपोषण मंडपात समाजबांधवांपुढे काही जणांचे भाषण सुरू होते. त्यावेळी अचानक अशोक जाधव हे पुढे आले. मराठा आरक्षणाला आपले समर्थन आहे असे म्हणत कुणाला काही कळण्यापूर्वीच त्यांनी हाती असलेले कोराजेन नावाचे विषारी औषध प्राशन केले. लगेचच बाजूला असलेले वैद्यकीय कर्मचारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी जाधव यांना रुग्णवाहिकेत टाकून स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचार्थ दाखल केले. तेथे डॉ. रमेश मांडन व त्यांच्या टिमने शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी डीवायएसपी प्रदीप पाडवी, ठाणेदार शंकर पाचाळ, पाेलिस उपनिरिक्षक सतीश खेडकर रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने अशोक जाधव यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अशोक देवराव जाधव हे डोंगराळ भागातील जेवली या गावाचे रहिवासी आहेत. केवळ दोन एकर शेतीवर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे. आईवडीलांचा तो एकलुता एक मुलगा आहे. त्यांचे वडील हयात नाहीत. वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. 

गावखेड्यातून रोज येत आहेत मोर्चे 

उमरखेड येथील मराठा आंदोलन तीव्र झाले आहे. १२ सप्टेंबर रोजी तालुक्यातील नागापूर, कुपटी, देवसरी, कारखेड, उंचवडद, दिवट पिंप्री, वानेगाव (पार्डी), सुकळी (ज.), अंबाळी या गावांमधील समाजबांधवांनी उमरखेडमध्ये मोर्चे आणले. तर मुळावा फाटा येथे रास्तारोको करण्यात आला. रोज हजारो समाजबांधव आरक्षणाच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवित मोर्चे आणत आहेत. त्यातच मंगळवारी युवकाने आरक्षणासाठी विष प्राशन केल्याने प्रशासनाची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली.

मुळावा येथे रस्ता रोको आंदोलन

मुळावा : जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांचे १५ दिवसांपासून उपोषण सुरू असूनही सरकारने मराठा आरक्षणासाठी  ठोस पाऊल न उचल्याने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मंगळवारी उमरखेड तालुक्यातील मुळावा व परिसरातील सकल मराठा बांधवांनी एकत्र येऊन उमरखेड-हिंगोली मार्गावर मुळावा फाटा येथे चक्कजाम आंदोलन केले. जरांगे यांच्यासह ठिकठिकाणी उपोषणास बसलेल्या नागरिकांची प्रकृती खालावत आहे. त्यामुळे सरकारचा निषेध करत हा चक्कजाम करण्यात आला. यावेळी सकल मराठा बांधवांनी सरकार विरोधी घोषणा देऊन व टायर जाळून रस्तारोको आंदोलन केले. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार, असा निर्धार व्यक्त केला.

Web Title: Youth consumes poison for Maratha reservation; chaos in the hunger strike pandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.