उमरखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये युवकाने दोन तास घातला गोंधळ, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 07:31 PM2023-07-18T19:31:08+5:302023-07-18T19:31:56+5:30
भयभीत कर्मचारी आणि रुग्णही पळाले
अविनाश खंदारे , उमरखेड (यवतमाळ) : येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये मंगळवारी दुपारी एका युवकाने तब्बल दोन तास गोंधळ घालून कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे भयभीत होऊन डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांसह रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयातून जिव वाचविण्यासाठी बाहेर पळाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळू कदम असे या युवकाचे नाव असून त्याने दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत गोंधळ घातला. शासकीय रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर त्याने वार्डामध्ये जाऊन डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांना धमकावले. अंगावर धावून गेला. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील सेवेवर असलेले सर्व डॉक्टर, महिला कर्मचारी व इतर रुग्ण यांनी आपला जीव वाचवण्यासाठी दवाखान्याच्या बाहेर धाव घेतली.
त्यापाठोपाठ रुग्णालयात भरती असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईकसुद्धा सैरावैरा बाहेर पळू लागले. हा सर्व प्रकार तब्बल दोन तास चालू होता. शासकीय रुग्णालयातून पोलीस प्रशासनाला माहिती दिल्या गेली. त्यानंतर लगेच उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार शंकर पांचाळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड, भारत चापाईतकर यांनी पोलीस ताफ्यासह रुग्णालयात दाखल झाले.
बाळू गणेश कदम या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. दोन तास आरोग्य कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक जीव मुठीत धरून बसले होते. पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतल्यानंतर सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रुग्ण आणि नातेवाईकांनी सुटकेचा श्वास सोडला. वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवानंद देवसरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात भादंवि ३५३, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी हा गेल्या तीन दिवसापासून शासकीय रुग्णालयात येऊन आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास देत होता. याची माहिती पोलिस प्रशासनाला दिली होती. मात्र त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे हा प्रकार घडला. सर्व डॉक्टर भयभीत आहेत. त्यामुळे हा प्रकार पोलिस प्रशासनाने गांभीर्याने घेऊन डॉक्टरांना दिलासा द्यावा.- डॉ. रमेश मांडन, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय रुग्णालय, उमरखेड