यवतमाळच्या रॅन्चोने बनविली इलेक्ट्रिक बाईक, भंगारातील दुचाकीला दिले नवे रुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2022 04:24 PM2022-01-23T16:24:46+5:302022-01-23T17:09:32+5:30
एखादे नवीन वाहन घ्यायचे तर लाखाच्यावर खर्च येतो. मात्र या प्रयोगाने ३० ते ४० हजारांत पुढील दहा वर्षे वाहन धावण्यास मदत होणार आहे.
यवतमाळ : मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या साकेत सुभाष डोंगरे या तरुणाने मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वत:च आपल्या कल्पकतेने काम करण्याचा निर्णय घेतला. त्यात त्याला यशही मिळाले. साकेतने भंगारातील दुचाकीवर यशस्वी प्रयोग केला आहे. या वाहनाचे इंजिन काढून त्यावर लिथेमाईन बॅटरी बसविली आहे. १५ मिनिटांत चार्ज होणारे वाहन शंभर किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. सर्वसाधारण नागरिकालाही यामुळे वाहन चालविणे सोपे होणार आहे. पेट्रोलचा खर्च वाचेल. याशिवाय पर्यावरणातील प्रदूषण नष्ट करण्यास मदत मिळणार आहे. हा प्रयोग सर्वसामान्यांचे बजेट सुधारण्यास हातभार लावणार आहे.
केंद्र शासनाने वाहनांची स्क्रॅपिंग पॉलिसी आणली आहे. १५ वर्षांच्या वरती वाहनांना रस्त्यावर धावण्यास बंदी घातली आहे. असे आवाहन पर्यावरणास मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवितात. यामुळे हे वाहन भंगारात जमा होणार आहे. अशा परिस्थितीत भंगारात जाणाऱ्या वाहनांना इलेक्ट्रिक डिव्हाईस बसवून पुन्हा कामात आणता येणार आहे. हे साकेतने त्याच्या प्रयोगातून सिद्ध केले आहे.
कुठलेही, कोणत्याही कंपनीचे दुचाकी वाहन यावर हा प्रयोग चालणार आहे. यामध्ये वाहनधारकाला पेट्रोल भरण्याची आवश्यकता नाही. इलेक्ट्रिक बॅटरीवर असे वाहन धावणार आहे. बाजारात असलेल्या इलेक्ट्रिक वाहनाच्या तुलनेत नाममात्र दरात हे वाहन रस्त्यावर धावण्यास मदत होणार आहे. आपल्या वाहनाचे इंजिन काढून त्याच्या जागेवर लिथेमाईन बॅटरी अथवा सुपर कॅपेसीटर बसवून हे वाहन पूर्वीप्रमाणे कार्यक्षम करण्यात आले आहे. साकेतने गत अनेक दिवसांपासून याचा प्रयोग केला आणि अशा स्वरूपाचे वाहन तयार केले आहे.
या स्वरूपाची बॅटरी लावून वाहनाचे आयुष्य पुढे दहा वर्षे वाढविले आहे. यामध्ये १५ मिनिटाला १०० किलोमीटरचे चार्जिंग शक्य झाले आहे. याचे स्पीडमीटर ८० पर्यंत नेण्यास यश आले आहे. याशिवाय ट्रिपल सीट भार ओढू शकेल इतकी क्षमता या वाहनात आहे.
एखादे नवीन वाहन घ्यायचे तर लाखाच्यावर खर्च येतो. मात्र या प्रयोगाने ३० ते ४० हजारांत पुढील दहा वर्षे वाहन धावण्यास मदत होणार आहे. पेट्रोलचा खर्च शून्य होईल. या १५ मिनिटांमध्ये दोन युनिट रिडींग येणार आहे. विशेष म्हणजे साध्या प्लगवरही बॅटरी चार्ज करता येणार आहे. यामुळे चार्जिंग सेंटरचा प्रश्नच राहणार नाही. पेट्रोलच्या डिझेलच्या वाढत्या किमती पाहता असे वाहन सर्वसामान्यांसाठी मोलाचे ठरणार आहे.