भरपावसात युवकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 09:35 PM2019-07-29T21:35:03+5:302019-07-29T21:35:21+5:30
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर महापरीक्षा पोर्टल लादण्यात आले आहे. पोर्टलच्या परीक्षा विश्वासार्ह नसल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहे. यामुळे महापोर्टल बंद करण्यात यावे, अशी मागणी करीत सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी प्रहारच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर महापरीक्षा पोर्टल लादण्यात आले आहे. पोर्टलच्या परीक्षा विश्वासार्ह नसल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहे. यामुळे महापोर्टल बंद करण्यात यावे, अशी मागणी करीत सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी प्रहारच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
तलाठी पदाची परीक्षा नुकतीच पार पडली. या परीक्षेत ओळखपत्र असतानाही एका विद्यार्थ्याला परीक्षेला बसू देण्यात आले नाही. काही विद्यार्थ्यांना १२० पैकी ११८ गुण मिळाले. हा प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. आॅनलाईन परीक्षा बंद करण्यात याव्या. एक परीक्षा एक पेपर या नियमानुसार परीक्षा घेण्यात याव्या. पोलीस भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविण्यात यावी. शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलद्वारे झालेला गोंधळ निकाली काढण्यात यावा. स्पर्धा परीक्षेमध्ये ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमातीलच प्रश्न विचारण्यात यावे. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतलेल्या परीक्षेची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. प्रहारचे बिपीन चौधरी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
बँकेला निकालासाठी अल्टिमेटम
जिल्हा बँकेने घेतलेल्या परीक्षेचा निकाल अजूनही विद्यार्थ्यांना मिळाला नाही. या परीक्षेचा निकाल चार दिवसांत जाहीर करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी विद्यार्थ्यांनी दिला.