कुपटी नदीच्या स्वच्छतेसाठी युवकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 05:00 AM2020-09-07T05:00:00+5:302020-09-07T05:00:18+5:30

संकेतकुमार महेंद्र अघमे, हिमांशू शंकर इहरे आणि क्रितिक रमेश चव्हाण, अशी या युवकांची नावे आहे. त्यांच्या नियोजनामुळे दरवर्षी विसर्जनानंतर निर्माण होणारे चित्र यावर्षी बदलले. कोरोनाच्या संकटामुळे घरगुती स्वरूपात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शासन, प्रशासनाने केले होते. त्याला येथे चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ३४ सार्वजनिक मंडळांपैकी २२ मंडळांनी अत्यंत छोट्या स्वरूपात श्री गणेशाची स्थापना केली होती.

Youth initiative for cleaning Kupati river | कुपटी नदीच्या स्वच्छतेसाठी युवकांचा पुढाकार

कुपटी नदीच्या स्वच्छतेसाठी युवकांचा पुढाकार

googlenewsNext
ठळक मुद्देकौतुकास्पद कार्य : दारव्हा येथे गणेश विसर्जनानंतर निर्माल्य, प्लास्टिक गोळा करून विल्हेवाट

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : शहरातील गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य, प्लास्टिक व इतर साहित्य गोळा करून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यात आली. नदीत आणि परिसरात घाण, प्रदूषण निर्माण होऊ नये याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी तीन युवकांनी पुढाकार घेतला. त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
संकेतकुमार महेंद्र अघमे, हिमांशू शंकर इहरे आणि क्रितिक रमेश चव्हाण, अशी या युवकांची नावे आहे. त्यांच्या नियोजनामुळे दरवर्षी विसर्जनानंतर निर्माण होणारे चित्र यावर्षी बदलले. कोरोनाच्या संकटामुळे घरगुती स्वरूपात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शासन, प्रशासनाने केले होते. त्याला येथे चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ३४ सार्वजनिक मंडळांपैकी २२ मंडळांनी अत्यंत छोट्या स्वरूपात श्री गणेशाची स्थापना केली होती. तसेच अनेकांच्या घरी श्री गणेश विराजमान झाले होते.
उत्सवानंतर शहरातील सार्वजनिक तसेच घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाकरिता जुन्या दिग्रस मार्गावरील कुपटी नदीवर व्यवस्था केली जाते. परंतु दहा दिवस अत्यंत धुमधडाका व भक्तीमय वातावरणात साजरा होणाऱ्या या उत्सवात विसर्जनानंतर मात्र नदी व परिसराची दयनीय अवस्था होते. ही अवस्था बदलावी, याकरिता तीन युवकांनी पुढाकार घेतला. ते शिक्षणाकरिता वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मात्र कोरोनामुळे ते आपल्या घरी आहे.
सुटीचा सदुपयोग करावा, या विचारात असताना विसर्जनानंतर नदी पात्रात होणारी घाण, प्रदूषण पाहून त्यांना ही कल्पना सुचल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी ठाणेदार मनोज केदारे यांची भेट घेतली. त्यांनी या कार्याला प्रोत्साहन दिले. हे युवक विसर्जनाच्या दिवशी नदीवर सज्ज झाले. त्यांनी विसर्जनासाठी सार्वजनिक व घरगुती गणेशभक्तांकडून मूर्ती व्यतिरिक्त असणारे साहित्य घेऊन प्लास्टिक, निर्माल्य व इतर अशी वेगवेगळी विभागणी केली. निर्माल्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली. नंतर कचरा नगरपालिकेच्या ताब्यात दिला. युवकांनी दिवसभर हजर राहून मेहनतीने हे कार्य पार पाडले. त्यांच्या नियोजनामुळे या ठिकाणी विसर्जन झाल्याचे कुणालाही वाटणार नाही, असे चित्र सध्या दिसून येत आहे. प्लास्टिक निर्मूलन आणि स्वच्छतेसाठी या युवकांनी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी ठरले आहे.

पोलीस ठाण्यात तीनही युवकांचा गौरव
येथील ठाणेदार मनोज केदारे यांनी या युवकांना या कार्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्यावतीने पोलीस ठाण्यात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन या युवकांचा गौरव करण्यात आला. प्लास्टिक, घाण, प्रदूषण ह्या आपल्यासमोरील मोठी समस्या आहे. मूर्ती विसर्जनानंतर दरवर्षी नदी पात्र व परिसरात घाणीचे साम्राज्य राहत होते. यावर्षी मात्र युवकांनी स्वच्छतेचे फार मोठे कार्य पार पाडले. त्यांनी या माध्यमातून चांगला संदेश दिला, असे मत ठाणेदार केदारे यांनी व्यक्त केले. या गौरवामुळे कार्याचे चिज झाल्याची प्रतिक्रिया युवकांनी दिली.

Web Title: Youth initiative for cleaning Kupati river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस