वणीत ‘भाईगिरी’तून युवकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 09:52 PM2018-02-08T21:52:55+5:302018-02-08T21:53:15+5:30
येथील महाराष्ट्र बँकेलगतच्या साठे चौैक परिसरात वर्चस्वाच्या लढाईत सहाजणांनी मिळून एका युवकाची हत्या केली. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने वणी शहर हादरले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील महाराष्ट्र बँकेलगतच्या साठे चौैक परिसरात वर्चस्वाच्या लढाईत सहाजणांनी मिळून एका युवकाची हत्या केली. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने वणी शहर हादरले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
सोनू उर्फ सिद्धार्थ दयाशंकर लोणारे (२५) असे मृताचे नाव आहे. सागर रमेश गोलाईत (२८) आकाश रमेश गोलाईत (२६), अमर रमेश गोलाईत (२४) हार्दिक दीपक उरकुंडे (२६), निलेश लक्ष्मण कावडे (२४), रा.वणी व संकेत काळे (२०) रा.यवतमाळ अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. दरम्यान, घटनेनंतर वणी पोलिसांनी तातडीने हालचाली करून मारेकऱ्यांपैैकी एकाला वणीत तर यवतमाळ मार्गाने मोटारसायकलद्वारे पळून जात असलेल्या तिघांचा ४० किलोमिटर पाठलाग करून पोलिसांनी त्यांना करंजीलगत अटक केली. या प्रकरणातील आकाश गोलाईत व निलेश कावडे हे दोघे फरार होण्यात यशस्वी झालेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. वणीसारख्या लहान शहरात गुंडांची वाढलेली दबंगगिरी सामान्यांच्या चिंतेचा विषय बनला आहे.
मृत सिद्धार्थ लोणारे व सागर गोलाईत यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वर्चस्वाची लढाई सुरू होती. परिसरात आपलीच भाईगिरी कायम राहावी, यासाठी हे दोघेही एकमेकांविरुद्ध कुरापती करीत होते, अशी चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी डीजे वाजविण्यावरून या दोघांत वाद झाला होता. त्यानंतरही अनेकदा विविध कारणावरून या दोघांमध्ये धुसफूस सुरू होती. बुधवारी रात्री सिद्धार्थचा मित्र अरुण तिराणकर (१९) हा महाराष्ट्र बँकेजवळील साठे चौकात पानटपरीवर गेला असता, सर्वप्रथम सागर गोलाईत व त्याच्या अन्य पाच सहकाऱ्यांनी अरुणवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र अरुणने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून तेथून पळ काढला. दरम्यान, अरूणने ही बाब सिद्धार्थला फोन करून सांगितली. सिद्धार्थ लगेच साठे चौकात पोहचला, तेव्हा मारेकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला चढविला. मारेकऱ्यांपैकी चौघांजवळ गुप्ती होती. या चौघांनीही सिद्धार्थला गुप्तीने भोसकले. आरोपींनी सिद्धार्थच्या शरीरावर जवळपास २६ घाव घातले. त्यामुळे सिद्धार्थ गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. अचानक घडलेली घटना पाहून परिसरातील नागरिक घाबरून गेले. घटनेची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक खाडे आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी पोहचलो. मात्र तोवर आरोपी तेथून पसार झाले होते. पोलिसांनी लगेच जखमी अवस्थेत पडून असलेल्या सिद्धार्थला ग्रामीण रूग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा तपास एपीआय गाडेमोडे करीत आहेत. याप्रकरणी भादंवि ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हल्लेखोर संकेत काळेविरुद्ध यवतमाळातही गुन्हा
या घटनेतील एक आरोपी संकेत काळे हा यवतमाळ येथील रहिवासी असून तोदेखील गुंड प्रवृत्तीचा आहे. यवतमाळ येथील वडगाव रोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भादंवि ३०७ अन्वये गुन्हा दाखल आहे. सिद्धार्थवर हल्ला केल्यानंतर संकेतने एम.एच.२९ एजी २००० या क्रमांकाच्या लाल रंगाच्या पल्सरवर सागर गोलाईत व हार्दिक उरकुडे या दोघांना बसवून घेऊन यवतमाळकडे पळून गेल्याची गोपनिय माहिती ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यानंतर खाडे यांच्या नेतृत्वात दोन वाहनातून पोलिसांचा ताफा यवतमाळ मार्गाने निघाला. जवळपास ४० किलोमिटरचे अंतर पार केल्यानंतर करंजीच्या अलिकडे तिघेजण मोटारसायकलवर भरधाव वेगाने यवतमाळकडे जात असल्याचे पोलिसांना दिसताच, त्यांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी आरोपींजवळून हल्ल्यात वापरलेले शस्त्र पोलिसांनी जप्त केले. हल्लेखारांपैैकी संकेत काळे हा बुधवारी एका कार्यक्रमासाठी यवतमाळवरून वणीत आला होता. सागर गोलाईत त्याचा मित्र असल्याने या दोघांची वणीतच भेट झाली. या भेटीत सिद्धार्थचा ‘काटा’ काढण्याबाबत कट आखण्यात आला. हल्ला करण्याअगोदर मारेकऱ्यांनी एका हॉटेलात मद्यप्राशन केले. त्यानंतर सिद्धार्थवर हल्ला करण्यात आला.
झटापटीत हल्लेखोरही झाला गंभीर जखमी
सिद्धार्थवर हल्ला करीत असताना झालेल्या झटापटीत आरोपी अमर गोलाईतच्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर तो थेट शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. याबाबत खबऱ्यांकडून गोपनिय माहिती मिळताच, ठाणेदार बाळासाहेब खाडे, डी.बी.पथकातील सुधीर पांडे, सुनिल खंडागळे, अनिल पोयाम, रत्नपाल मोहाडे, नितीन सलाम, दीपक वांड्रसकर, अरूण नाकतोडे, चालक प्रशांत आडे यांनी संबंधित रुग्णालयाकडे धाव घेऊन तेथे उपचार घेत असलेल्या अमर गोलाईतला लगेच अटक केली.