‘त्या’ युवकाचा खून अनैतिक संबंधातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 09:58 PM2019-05-13T21:58:04+5:302019-05-13T21:58:20+5:30
तालुक्यातील बोथबोडन शिवारातील भाटणी तलावात जळालेला मृतदेह आढळला. मात्र ओळख पटत नव्हती. परिसरात कुठेही बेपत्ता असल्याची तक्रार नसल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान होते. टोळीविरोधी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे या खुनाचा छडा लावला. या गुन्ह्यात सहा आरोपींना अटक झाली असून अनैतिक संबंधातून हा खून केल्याची कबुली त्यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तालुक्यातील बोथबोडन शिवारातील भाटणी तलावात जळालेला मृतदेह आढळला. मात्र ओळख पटत नव्हती. परिसरात कुठेही बेपत्ता असल्याची तक्रार नसल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान होते. टोळीविरोधी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे या खुनाचा छडा लावला. या गुन्ह्यात सहा आरोपींना अटक झाली असून अनैतिक संबंधातून हा खून केल्याची कबुली त्यांनी दिली.
धनराज हरिभाऊ मेश्राम रा. इचोरी असे मृताचे नाव आहे. धनराज होळीपासून तो बेपत्ता होता. मात्र नातेवाईकांनी तक्रार दिली नाही. धनराज हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून हत्येच्या काही आठवड्यांपूर्वीच त्याची कारागृहातून सुटका झाली होती. त्याचा अनैतिक संबंधातून इचोरी येथील सहा जणांनी खून केला. त्यानंतर प्रेत जाळून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या बोथबोडन तलावात फेकून दिले. गुप्त माहितीवरून टोळीविरोधी पथकाने त्याचा छडा लावला.
तलावात १९ मार्च रोजी जळालेला मृतदेह तरंगत असल्याची तक्रार सरपंच दिनेश पवार यांनी लाडखेड पोलिसांकडे केली. मात्र मृतदेहाची ओळख पटली नसल्याने तपास पुढे सरकला नाही. टोळीविरोधी पथकाने त्याच्या पातळीवर तपास सुरू केला. लोहारा येथून गोपनीय माहितीद्वारे या गुन्ह्याची कडी गवसली. मृतकाची बहीण येथे वास्तव्याला आहे. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर धनराज हा होळीपासून यवतमाळला आलाच नाही, अशी माहिती मिळाली. तो इचोरी येथील रामदास शिंदे याच्या शेतात राहत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी इचोरीच्या पोलीस पाटलाशी संपर्क केला. त्यांनीसुद्धा होळीपासून धनराज बेपत्ता असल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी तातडीने रामदास शिंदे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने धनराज शिंदे याचा खून करून मृतदेह जाळल्याची कबुली दिली. यावरून टोळीविरोधी पथकाने पुरूषोत्तम बथरू ठोंबरे, रमेश पुरूषोत्तम ठोंबरे, उमेश श्रीराम ठोंबरे, मंगेश उर्फ बाल्या अगलधरे, किसन शंकरराव उमाटे यांना अटक केली. त्यांनी अनैतिक संबंध असल्याची बदनामी केल्यावरून धनराजचा काटा काढल्याचे पोलिसांना सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप सिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली टोळी विरोधी पथकाने केली. पोलिसांपुढे जिल्ह्यातील अशा अनेक गंभीर गुन्ह्यांच्या डिटेक्शनचे आव्हान आहे. रिव्हॉल्वर सारख्या अग्नीशस्त्रांचे मुख्य तस्कर, विक्रेते शोधण्यात टोळी विरोधी पथकाला यश येते काय, याकडे शहराच्या नजरा लागल्या आहेत.
दहा अज्ञात गुन्हे उघड
जिल्हा पोलीस दलात टोळीविरोधी पोलीस पथकाने पाच वर्षात दहा अज्ञात गुन्हे उघड केले. मृतदेहाची ओळख पटवून आरोपींना अटक केली. विशेष असे अनेक प्रकरणात कोणतीच तक्रारही दाखल नसताना त्याचा तपास पूर्ण केला.