पोलिस चौकशीत प्रकृती बिघडून युवकाचा मृत्यू; पोलिसांविरोधात जमाव रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 10:51 IST2025-02-28T10:50:28+5:302025-02-28T10:51:53+5:30
Yavatmal : आर्णीत जनक्षोभ; सीआयडीसह वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल

Youth's death due to deterioration in police investigation; Crowds on the streets against the police
आर्णी (यवतमाळ) : अवैध दारू गुत्त्यांवर कारवाईसाठी आर्णी पोलिसांचे पथक अंतरगाव येथे दाखल झाले. त्यांनी बुधवारी सायंकाळी एका युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेथेच त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर तो मित्राच्या मदतीने रुग्णालयात पोहोचला.
आर्णी येथून त्याला यवतमाळात रेफर करण्यात आले. मात्र, जवळा गावाजवळ त्याची प्रकृती आणखी खालावली. रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती आर्णी शहरात पोहोचताच पोलिसांविरोधात मोठा जमाव रस्त्यावर उतरला. मुख्य मार्गावर टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली. तातडीने जादाची पोलिस कुमक आर्णी शहरात पोहोचली.
मांगीलाल रतन जाधव (३५, रा. अंतरगाव, ता. आर्णी) असे मृत युवकाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी ६:३० वाजता आर्णी पोलिस ठाण्यातील शोध पथकाच्या चार कर्मचाऱ्यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अंतरगावपासून काही अंतरावर त्याला घेऊन गेले. तेथे चौकशी सुरू असतानाच मांगीलालच्या छातीत दुखू लागले. ते पाहून चारही पोलिस कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. मांगीलालने मित्र संतोष याला बोलावले आणि आर्णी येथील डॉक्टरकडे गेला.
मर्ग दाखल करून घटनेचा तपास
- या प्रकरणात आर्णी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेचा तपास सुरू आहे. मांगीलालचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यासाठी यवतमाळात मृतदेह आणण्यात आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सीआयडीचे पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी अंतरगाव येथे भेट दिली.
- त्या डॉक्टरांनी ईसीजी काढून मांगीलालला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे जाण्याचा सल्ला दिला. याकरिता बाबूलाल जयस्वाल यांनी मांगीलालला वाहन व पैसे उपलब्ध करून दिले.
- तो यवतमाळकडे निघाला असताना जवळा गावाजवळ मांगीलालची प्रकृती खालावली. बेशुद्धावस्थेत त्याला परत आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मांगीलालचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ही घटना अंतरगाव येथे माहीत पडताच संतप्त जमाव आर्णीत दाखल झाला.
सीआयडीकडून चौकशी सुरू
- सीआयडीच्या उपअधीक्षक वर्षा देशमुख यांच्याकडून या घटनेचा तपास केला जात आहे. गावातील नागरिकांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण पुढे येईल. यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे सीआयडी एसपी डॉ. पवन बन्सोड यांनी 'लोकमत'ला सांगितले.
- पोलिसांनी धाकदडपशाही केल्यामुळेच मांगीलालचा मृत्यू झाला, असा आरोप करीत नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केले. ग्रामीण रुग्णालयासमोर बुधवारी रात्री ११ वाजता टायर जाळून कारवाईची मागणी केली.
- परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, दारव्हा उपविभागीय अधिकारी रजनिकांत चिलुमुला, एलसीबीचे प्रमुख सतीश चवरे आर्णीत दाखल झाले. अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. गुरुवारी शहरात तणावपूर्ण शांतता होती. मृताच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.