दारू पिल्याने युवकाचा मृत्यू, पोळ्याच्या दिवशीची घटना; गावकरी धडकले राळेगाव पोलीस ठाण्यावर

By विलास गावंडे | Published: September 15, 2023 06:20 PM2023-09-15T18:20:30+5:302023-09-15T18:20:51+5:30

पोळाच्या दिवसात खेड्यापाड्यात दारूचा महापूर असतो.

Youth's death due to drinking, Hive day incident Villagers attacked Ralegaon police station | दारू पिल्याने युवकाचा मृत्यू, पोळ्याच्या दिवशीची घटना; गावकरी धडकले राळेगाव पोलीस ठाण्यावर

दारू पिल्याने युवकाचा मृत्यू, पोळ्याच्या दिवशीची घटना; गावकरी धडकले राळेगाव पोलीस ठाण्यावर

googlenewsNext

राळेगाव (यवतमाळ) : पोळाच्या दिवसात खेड्यापाड्यात दारूचा महापूर असतो. विषारी दारू पिल्याने वाटखेड येथील तरुण सचिन खुशालराव वाघ (२५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोळ्याच्या दिवस असल्यामुळे खुशालने रात्री भरपूर  दारू प्याली व झोपी गेला. सकाळी तो जागा का होत नाही आई-वडिलांनी पाहिले त्याची प्रकृती गंभीर होती. उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे आणले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान गावठी दारू जवळच्या गोपालनगर परिसरातून येत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. गावातील तरुण विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडल्यामुळे ३० महिला व २० पुरुष राळेगाव ठाण्यावर धडकले. 

जोपर्यंत दारू विक्रेत्याना पकडून ठाण्यात आणत नाही, तोपर्यंत आम्ही हलणार नाही असा ठाम निर्णय ग्रामस्थांनी घेतला. शुक्रवारी सकाळी आठ वाजता दाखल झालेले ग्रामस्थ अकरा वाजेपर्यंत ठाण्यात ठिय्या मांडून बसून होते. ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी परिस्थितीचे गांभीर लक्षात घेऊन पोलिसांना आरोपींना पकडण्याकरिता वाटखेड गावाकडे पाठविले. तेव्हा ग्रामस्थ शांत झाले. दरम्यान गावकऱ्यांनी सांगितले की, वाटखेड येथील पोलीस पाटलांना गावातील अवैध दारू विक्रीबद्दल वारंवार सूचना देऊनही तक्रार करूनही पोलीस पाटील गांभीर्याने घेत नाही. सचिन वाघ हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून शेती व रोजमजुरी यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा. घरातील एकुलता एक तरुण मुलाचा मृत्यू पडल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सणासुदीच्या दिवसांमध्ये दारू विक्री होऊ नये, गावात शांतता व सुव्यवस्था नांदावी म्हणून ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी शहरातील लायसन धारक दारूची दुकाने बार सकाळी ११ ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद राहतील, असे फर्मान काढले होते, परंतु लायसनधारक दारू विक्री बंद असली तरी अवैध दारू विक्रेते मात्र अधिक सक्रिय होते,  त्यामुळेच ही घटना घडली असे बोलले जात आहे.            

 दोन वाजता वाऱ्हा येथील महिला पोहोचल्या 
राळेगाव पोलीस स्टेशनवर सकाळी आठ वाजता वाटखेड येथील महिलांनी तीन तास  ठिय्या मांडला. दुपारी दोन वाजता वाऱ्हा येथील २५  महिला आपल्या गावातील अवैध दारू बंद करा, अशी मागणी घेऊन राळेगाव पोलीस स्टेशनला पोहोचल्या. गावात अवैध दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे. तरुण पिढी दारूच्या मागे लागून स्वतःचे जीवन संपवत आहे. आमच्या गावातील दारू त्वरित बंद करा अशा घोषणा महिला ठाण्यात देत होत्या. दरम्यान वारा येथील महिला मागल्या वर्षीच्या नंदी पोळ्याच्या दिवशी देखील एक वर्षांपूर्वी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. पोलीस विभाग जाणीवपूर्वक या बाबीकडे दुर्लक्ष करतात असा आरोप महिला करीत होत्या. आज पोळ्याचा दिवस बालगोपालांचे नंदी सजवण्यासाठी नेहमी महिला पुढाकार घेतात. परंतु त्यांना मात्र या पोळ्याचा आनंद घेता येत नाही. दारूमुळे त्यांना दारू बंद करण्याकरिता पोलीस स्टेशनला धाव घ्यावी लागते. पोलीस विभाग आरोपीला पकडून आणतात, थातूरमातूर कारवाई करतात आणि सोडून देतात. अवैध दारू विक्री बंद करण्यास पोलीस विभाग सपशेल अपयशी ठरत आहे.
 

Web Title: Youth's death due to drinking, Hive day incident Villagers attacked Ralegaon police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.