पूसद उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी तरुणांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:35 AM2021-05-03T04:35:41+5:302021-05-03T04:35:41+5:30
पूसद : येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी रविवारी तरुणांची झुंबड उडाली. यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने ...
पूसद : येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी रविवारी तरुणांची झुंबड उडाली. यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर
शासनाने जाहीर केल्यानुसार १८ ते ४४ वयोगटांतील तरुणांनी लसीकरणासाठी रविवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून गर्दीला नियंत्रित केले. १ मे पासून १८ ते ४४ वयोगटांतील तरुणांचे मोफत लसीकरण करण्याची शासनाने घोषणा केली. त्यानुसार २८ एप्रिलपासून ज्या तरुणांनी ऑनलाइन नोंदणी केली, त्यांच्या लसीकरणाला येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवारी दुपारी उशिरा सुरुवात झाली.
तत्पूर्वी नागरिकांनी सकाळपासूनच उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. त्यासाठी अनेकांना रुग्णालयातर्फे टोकनही देण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी शासनाने नोंदणी केलेल्या केवळ पहिल्या २०० नागरिकांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे इतर तरुणांचा चांगलाच हिरमोड झाला. त्यांना आल्या पावली घरी परतावे लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. नागरिकांची वाढती गर्दी पाहता उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने शहर पोलिसांना पाचारण केले होते. पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून सूचना देत गर्दी नियंत्रणात आणली.
येथील उपजिल्हा रुग्णालयात शासनाच्या आदेशानुसार १८ ते ४४ वयोगटांतील तरुणांचे पुढील सात दिवस दररोज २०० तरुणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. रविवारी पहिल्या दिवशी संगणकाच्या तांत्रिक अडचणीमुळे लसीकरणाला थोडी उशिरा सुरुवात झाली. ऑनलाइन नोंदणी केलेल्या २०० लोकांची यादी रुग्णालयाच्या भिंतीवर दररोज लावण्यात येणार आहे. नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ फुपाटे यांनी केले.
बॉक्स
जिल्ह्यात केवळ पाच केंद्र
केंद्र
शासनाने १८ ते ४४ वयोगटांतील तरुणांचे मोफत लसीकरण करण्याचे आदेश दिले. मात्र, जिल्ह्यात केवळ पाच ठिकाणीच लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. यामध्ये पूसद उपजिल्हा रुग्णालय, दारव्हा उपजिल्हा रुग्णालय, पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय आणि यवतमाळच्या लोहारा व पाटीपुरा उपकेंद्रांचा समावेश असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी दिली.