हळदीच्या कार्यक्रमासाठी गेला अन् घरी परतलाच नाही; चार संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 01:50 PM2023-06-24T13:50:30+5:302023-06-24T13:52:36+5:30
वाघापूर येथील तरुणाच्या खूनप्रकरणी चार संशयित ताब्यात, तर वटफळा येथे रखवालदाराच्या मृतदेहाजवळ सापडली विषाची बाटली, श्वानपथक पाचारण
यवतमाळ : शहरातील खुनाच्या घटनांचे सत्र थांबायला तयार नाही. शुक्रवारी सकाळी नागपूर बायपासवर वाघापुरातील तरुणाचा मृतदेह रक्ताने माखलेला दिसला. शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेला. तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू केली आहे. रोशन ऊर्फ ज्ञानेश्वर मस्के (३०, रा. वाघापूर पिंपळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
लोहारा पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वाघापूर पिंपळगाव येथील रोशन ऊर्फ ज्ञानेश्वर मस्के हा गुरुवारी रात्री मित्रांसोबत हळदी समारंभासाठी गेला होता. समारंभ आटोपून सर्व मित्र रात्रीच आपापल्या घरी गेले. मात्र, रात्र होऊनही ज्ञानेश्वर मस्के घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी सगळीकडे शोधाशोध केली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी नागपूर महामार्गावरून जाणाऱ्या रस्त्याच्या दाट झाडीत ज्ञानेश्वर मस्के यांचा मृतदेह पडलेला दिसला.
शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटवली. शहर पोलिसांनी त्यांची वेगवेगळी पथके पाठवून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. त्याचवेळी पोलिसांनी चार संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नंदकिशोर पंत करीत आहेत.
रखवालदाराचा कुजलेला मृतदेह सापडला
नेर तालुक्यातील वटफळा येथे एका बेवारस घरात कुजलेल्या अवस्थेत एका रखवलदाराचा मृतदेह आढळला. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. राजू पांडुरंग बांडाबुचे, असे मृत रखवालदाराचे नाव आहे. तो अंजनगाव-बारी, ता.जि. अमरावती येथील रहिवासी आहे. अमरावती येथील रवींद्र वैद्य यांच्या वटफळा परिसरातील शेतात तो रखवालदार म्हणून काम करत होता. २१ जून रोजी मृत राजूविरुद्ध शेतकरी रवींद्र वैद्य यांचे दिवाणजी नंदकुमार डकरे यांनी शेतातील ६३ पाइप कुऱ्हाडीने फोडल्याची तक्रार केली होती.
दरम्यान, शुक्रवारी राजूचा मृतदेहच वटफळा येथील अंजना सहारे या महिलेच्या घरी सापडला. विशेष म्हणजे अंजना सहारे या वृद्धेचा सहा महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या बेवारस घरात राजूचा मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ विषाची रिकामी बाटली आढळली आहे. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात, याचे गूढ वाढले आहे. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक व फिंगरप्रिंट पथकाला पाचारण केले. मृतदेह कुजलेला असल्याने श्वानपथकालाही काही गवसले नाही. ही घटना २१ व २२ जूनच्या दरम्यान घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. घटनेचा अधिक तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक किशोर खंदार, गणेश हिरुळकर, गजानन पत्रे, नरेंद्र सूर्यवंशी करीत आहेत.
घातपाताची शक्यता
मृत राजू एक वर्षापासून रवींद्र वैद्य यांच्या शेतात रखवालदार म्हणून काम करीत होता. बेवारस घरात त्यांचा मृत्यू कसा झाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाणजीच्या तक्रारींशी या घटनेचा काही संबध आहे का, या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. मृतदेहाजवळ विषाची बाटली कुणी जाणीवपूर्वक ठेवली का, याचा तपासही सुरू आहे. दरम्यान, माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.