एक शून्य शून्य... टवाळखोरांमुळे बिझी

By admin | Published: August 7, 2016 01:05 AM2016-08-07T01:05:59+5:302016-08-07T01:05:59+5:30

संकटाच्या काळात देवासोबतच कोणताही माणूस धावा करतो तो पोलिसांचा. या क्षणात पोलिसांची मदत...

A zero zero ... tangled by tactics | एक शून्य शून्य... टवाळखोरांमुळे बिझी

एक शून्य शून्य... टवाळखोरांमुळे बिझी

Next

हेल्पलाईनवर पोलिसांचीच चेष्टा : शिवीगाळ आणि धमकीही
सुरेंद्र राऊत यवतमाळ
संकटाच्या काळात देवासोबतच कोणताही माणूस धावा करतो तो पोलिसांचा. या क्षणात पोलिसांची मदत मिळविण्यासाठी १०० हा क्रमांक अनेकांना जवळचा वाटतो. या क्रमांकावर आलेल्या कॉलची दखलही तत्काळ घेतली जाते. टवाळखोरांनी आता हा १०० क्रमांक पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला आहे. अनावश्यक फोन कॉल येत असल्याने खऱ्या संकटग्रस्ताला मदत मिळणे दुरापास्त ठरू पाहात आहे. जिल्ह्याच्या पोलीस नियंत्रण कक्षात असलेल्या या क्रमांकावर फोन कॉल करून चक्क पोलिसांनाच वेठीस धरले जात आहे.
रस्त्यावर वाहतुकीस खोळंबा निर्माण झाला तरी प्रत्येक जण सरळसोटपणे पोलिसांनाच दोषी ठरवतो. सध्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील जनतेच्या रोषाला सर्वाधिक बळी ठरणारी पोलीस यंत्रणा आहे. या यंत्रणेकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा असतात. मात्र नागरिक म्हणून स्वत:ची जबाबदारी प्रत्येक जण सोईस्करपणे विसरतो. याचा प्रत्यय जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातील १०० नंबर या क्रमांकावर येत असलेल्या फोन कॉल्सवरून दिसून येते. आज समाजात पोलिसांची प्रतिमा ही सर्वच स्तरातून खलनायकासारखीच बिंबविण्यात आली. त्यामुळेच कदाचित पोलिसांची चेष्टा करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे भयावह वास्तव अनुभवास येते. अडचणीत असलेल्या व्यक्तींना तत्काळ मदत मागता यावी, यासाठी २४ तास सुरू असणारा १०० नंबर आहे. कोणालाही कुठेही तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस यंत्रणेने ही सुविधा निर्माण केली आहे. आता या सुविधेचा उपयोग करमणुकीचे साधन म्हणून केला जात आहे.
‘लोकमत’च्या प्रस्तुत प्रतिनिधीने पोलीस नियंत्रण कक्षातील १०० नंबरवर येणाऱ्या कॉलचा खुद्द अनुभव घेतला. यामध्ये चक्क पोलीस कर्मचाऱ्यांनाच फोरवरून शिवीगाळ केली जाते. अनेकदा तर ‘तुम्ही मोबाईल रिचार्ज करता का?’ अशी विचारणा होते. नुसता कॉल लावून फोन ठेवला जातो. अर्धा मिनिटही हा फोन शांत नसतो. सातत्याने त्यावर कॉल येत असतात. नागपूर आणि चंद्रपूर येथून मोठ्या प्रमाणात कॉल येतात. त्यावर उडवाउडवी केली जाते. कोठून बोलता, याचे उत्तर कोणीच देत नाही. कधी तरी मध्यरात्री मिसकॉल का दिला म्हणून फोन घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यालाच शिवीगाळ केली जाते. असे अनेक कॉल तासाभरात अनुभवायला मिळाले. पोलिसांशी खेळ करणारे क्रमांक दिसतात. त्याची नोंदही रजिस्टरमध्ये केली जाते. मात्र, कारवाई कुणाकुणावर करायची, हा प्रश्न आहे. नित्याचीच बाब म्हणून कर्मचारी आता या फोनकडे बघतात. या गोंधळामुळे खऱ्या अडचण असलेल्या व्यक्तीला मदत मिळणे कठीण होऊन बसले आहे. जबाबदारीचे भान नसलेल्यांकडून १०० नंबरचा मनमानी वापर सुरू आहे. कधी कधी तर पती-पत्नीच्या घरगुती भांडणाचे ‘लाइव्ह टेलिकॉस्ट आॅन कॉल’ ऐकविले जाते. या सर्व प्रकारामुळे १०० नंबरवर कार्यरत असलेला कर्मचारी पुढची व्यक्ती बोलल्याशिवाय ‘हॅलो’ म्हणण्यासही धजावत नाही.

 

Web Title: A zero zero ... tangled by tactics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.