जिल्हा परिषद : कृषी, बांधकाम, समाजकल्याणच्या योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 09:55 PM2018-01-14T21:55:52+5:302018-01-14T21:56:20+5:30
जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांकडे कोट्यवधींचा निधी अखर्चित आहे. मार्च महिना तोंडावर आल्याने हा निधी खर्च करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांकडे कोट्यवधींचा निधी अखर्चित आहे. मार्च महिना तोंडावर आल्याने हा निधी खर्च करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे १२ कोटी, बांधकामकडे रस्ते दुरूस्ती व परीरक्षणाचे तीन कोटी, कोलाम पोड जोडणी रस्त्याचे १० कोटी, आरोग्य विभागाकडे तीन कोटी, समाजकल्याणकडे पाच कोटींच्यावर, असा कोट्यवधींचा निधी अखर्चित आहे. शासनाने विविध योजनांच्या पूर्ततेसाठी हा निधी उपलब्ध करून दिला. गेल्या नऊ महिन्यात बहुतांश विभागांना हा निधी खर्ची घालता आला नाही. विशेष म्हणजे यात मागील आर्थिक वर्षात शिल्लक राहिलेल्या काही निधीचा समावेश आहे. तो निधी या वर्षात खर्च करण्याची परवानगी घेण्यात आली होती. तरीही तो खर्च झाला नाही.
समाजकल्याण विभागातर्फे १७ विविध योजना राबविण्यात येतात. त्यात शेतकºयांना ताडपत्री, स्प्रे पंप, शीलाई मशीन, भजनी साहित्य, आॅईल इंजिन पुरविणे आदी योजनांचा समावेश आहे. त्यासाठी कोट्यवधींचा निधी आला. मात्र तो अखर्चित आहे. लाभार्थ्यांकडून अर्जच येत नसल्याची लंगडी सबब त्यासाठी सांगितली जात आहे.
कृषी विभागाकडे एकट्या सेस फंडातील सव्वा दोन कोटी रूपये पडून आहे. त्यामुळे शेतकºयांना अद्याप इलेक्ट्रीक मोटर पंप, डिझेल इंजिन, स्प्रे पंप, हॅन्ड स्प्रे पंप, ताडपत्री, पीव्हीसी पाईप, आदी साहित्य मिळाले नाहे. परिणामी दोन कोटी २२ लाख रूपये पडून आहेत.