जिल्हा परिषदेत भरली शिक्षकांची जत्रा
By admin | Published: April 16, 2017 01:07 AM2017-04-16T01:07:39+5:302017-04-16T01:07:39+5:30
जिल्हा परिषदेत शनिवारी जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षिकांची अक्षरश: जत्रा भरली होती.
यवतमाळ : जिल्हा परिषदेत शनिवारी जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षिकांची अक्षरश: जत्रा भरली होती. विषय शिक्षकाच्या नियुक्तीसाठी पाचारण करण्यात आलेले शिक्षक मिळेल तेथे जागा धरून बसले होते.
कार्यरत पदवीधर शिक्षकांची आता संबंधित विषय शिक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी गणीत विषयाचे ८०८, भाषा विषयाचे ४३६, तर समाजशास्त्राच्या ३१४ शिक्षकांना समुपदेशनाव्दारे नियुक्ती दिली जात आहे. शनिवारी यापैकी निम्म्या शिक्षकांना समुपदेशनासाठी पाचारण करण्यात आले होते. उर्वरित शिक्षकांना रविवारी बोलविण्यात आले आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांना पाचारण करण्यात आल्याने शनिवारी जिलहा परिषदेत सर्वत्र शिक्षकांची मांदिआळी दिसत होते.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात क्रमानुसार शिक्षकांना पाचारण करण्यात आले. तेथे रिक्त जागांवर त्यांना नियुक्ती देण्यात आली. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. शिक्षण विभागाचे कोणतेच नियोजन नसल्याने शिक्षिकांना बसण्यासाठी जागासुद्धा मिळत नव्हती. पदाधिकाऱ्यांच्या कक्षातून त्यांना हुसकावून लावण्यात येत होते. पाणीसुद्धा मिळणे दुरापास्त झाले होते. जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने राजुदास जाधव यांच्या नेतृत्वात पाण्याची व्यवस्था केल्याने त्यांना थोडा दिलासा मिळाला. दरम्यान, उद्या रविवारीही हीच स्थिती निर्माण होण्याची भीती शिक्षकांनी वर्तविली. (शहर प्रतिनिधी)