जिल्हा परिषद गट, गणांच्या रचनेत दिग्गजांना झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 05:00 AM2022-06-03T05:00:00+5:302022-06-03T05:00:20+5:30

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणांचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध केला. यात आठ गट आणि १६ गणांची वाढ झाली आहे. याशिवाय जुने गट आणि गणांची मोडतोड झाली आहे. काही तालुक्यांमध्ये नवीन गट आणि गण तयार झाले आहेत. त्याचा फटका संबंधित तालुक्यातील दिग्गजांना बसणार आहे. अनेकांना नवीन गट आणि गणातून लढण्याची तयारी करावी लागणार आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या आठ आणि पंचायत समितीच्या १६ जागा वाढल्याने नवीन इच्छुकांना संधी मिळणार आहे.

Zilla Parishad groups, blows to veterans in the formation of gangs | जिल्हा परिषद गट, गणांच्या रचनेत दिग्गजांना झटका

जिल्हा परिषद गट, गणांच्या रचनेत दिग्गजांना झटका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांची घोषणा केली. नवीन रचनेत अनेक दिग्गजांचे गट गायब झाले. त्यामुळे काहींना नवीन गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे. घोषित गट आणि गणांच्या रचनेमुळे कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या आठ तर पंचायत समितीच्या १६ जागा वाढल्या आहेत. 
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणांचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध केला. यात आठ गट आणि १६ गणांची वाढ झाली आहे. याशिवाय जुने गट आणि गणांची मोडतोड झाली आहे. काही तालुक्यांमध्ये नवीन गट आणि गण तयार झाले आहेत. त्याचा फटका संबंधित तालुक्यातील दिग्गजांना बसणार आहे. अनेकांना नवीन गट आणि गणातून लढण्याची तयारी करावी लागणार आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या आठ आणि पंचायत समितीच्या १६ जागा वाढल्याने नवीन इच्छुकांना संधी मिळणार आहे. आठ तालुक्यांत प्रत्येकी एक गट आणि दोन गणांची वाढ झाली आहे. 
बाभूळगाव तालुक्यात फाळेगाव, गणोरी आणि सावर हे तीन गट अस्तित्वात आले. कळंब तालुक्यात कोठा, नांझा व डोंगरखर्डा तर राळेगाव तालुक्यातील जळका, खैरी आणि झाडगाव हे गट तयार झाले. मारेगाव तालुक्यात कुंभा आणि वेगाव तर वणी तालुक्यात राजूर, वेल्हाळा, तरोडा, वागदरा, शिरपूर हे गट तयार झाले. झरी तालुक्यात माथार्जुन, मुकुटबन आणि पाटण तर केळापूर तालुक्यात मोहदा, सायखेडा, पहापळ आणि पाटणबोरी हे गट अस्तित्वात आले. घाटंजी तालुक्यात खापरी, शिरोली, पार्डी (न.) आणि पारवा हे चार गट तयार झाले. यवतमाळ तालुक्यात भारी, आकपुरी, अकोलाबाजार, रुई हे चार गट अस्तित्वात आले. नेर तालुक्यात पाथ्रड गोळे, मांगलादेवी आणि बानगाव तर दारव्हा तालुक्यात बोरी (खु), लाडखेड, लोही, भांडेगाव आणि महागाव कसबा हे गट अस्तित्वात आले. आर्णी तालुक्यात जवळा, बारेगाव (दा), सुकळी आणि सावळी (स) तर दिग्रस तालुक्यात आरंभी, कलगाव, तुपटाकळी आणि हरसूल हे गट अस्तित्वात आले. पुसद तालुक्यात जांबबाजार, बान्सी, मधुकरनगर, बोरगडी, श्रीरामपूर, कवडीपूर, रोहडा, शेंबाळपिंपरी आणि शिळोणा हे गट अस्तित्वात आले. महागाव तालुक्यात काळी (दौ.), माळकिन्ही, हिवरा, गुंज, सवना आणि फुलसावंगी हे गट तयार झाले. उमरखेड तालुक्यात निंगनूर, खरबी, ब्राह्मणगाव, कृष्णापूर, पोफाळी, मुळावा आणि विडूळ हे गट आहेत. 

  आठ तालुक्यांत जागा वाढल्या 
- नवीन रचनेत बाभूळगाव, वणी, झरी जामणी, घाटंजी, दिग्रस, पुसद, महागाव आणि उमरखेड या तालुक्यांत जिल्हा परिषदेची प्रत्येकी एक तर पंचायत समितीच्या प्रत्येकी दोन जागा वाढल्या आहेत. उर्वरित आठ तालुक्यांमध्ये सदस्य पदांची संख्या जैसे थे आहे. मात्र जुने गट आणि गणांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. तर काही नवागतांना लाॅटरी लागण्याची शक्यता वाढली आहे. 
  माजी उपाध्यक्षांना झटका
- गटांच्या नवीन रचनेत माजी उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर व त्यांच्या पूर्वीच्या उपाध्यक्षाला झटका बसला आहे. त्यांचे गटच गायब होऊन नवीन गट अस्तित्वात आले आहेत. दुसरीकडे माजी अध्यक्ष कालिंदा पवार आणि माधुरी आडे यांचे गट नवीन रचनेत कायम राहिले आहेत. याशिवाय माजी सभापती श्रीधर मोहोड, राम देवसरकर, विजय राठोड यांचे गटही जैसे थे आहेत. त्यामुळे माजी पदाधिकाऱ्यांमध्ये कहीं खुशी कहीं गम असे वातावरण दिसून येत आहे. 

आरक्षणानंतरच खरे चित्र 
- सध्या गट आणि गणांचा मसुदा जाहीर झाला आहे. त्यावर ८ जूनपर्यंत हरकती सादर करता येणार आहेत. त्यानंतर गट आणि गणांचे आरक्षण निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या ६९ पैकी तब्बल ३५ जागा महिलांसाठी आरक्षित होण्याची शक्यता आहे. याशिवाय अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षण काढले जाणार आहे. या आरक्षणानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र तूर्तास गटांचा मसुदा जाहीर झाल्याने इच्छुक आतापासूनच कामाला लागणार आहेत. 
  पुसद, उमरखेड, महागाव तालुके निर्णायक
- जिल्हा परिषदेच्या ६९ पैकी तब्बल २२ जागा पुसद, महागाव आणि उमरखेड तालुक्यात आहेत. पुसदमध्ये नऊ, उमरखेडमध्ये सात तर महागाव तालुक्यात सहा जागा आहेत. याशिवाय दारव्हा आणि वणी तालुक्यात प्रत्येकी पाच जागा आहेत. या पाच तालुक्यांमधून २२ सदस्य निवडले जाणार आहेत. त्यामुळे हे तालुके जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. उर्वरित तालुक्यांमध्ये प्रत्येकी चार आणि तीनच जागा आहेत.
 

राजकीय चित्र पालटण्याची शक्यता
- गेल्या निवडणुकीत ६१ पैकी २० जागा जिंकून शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. त्याखालोखाल भाजपने १८, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी ११, तर एका अपक्षाने विजय मिळविला होता. अपक्ष सदस्याने नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पहिल्या अडीच वर्षात काँग्रेसच्या मदतीने भाजपने सत्तेची चव घेतली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने अडीच वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेने सत्तेचा गाडा हाकला. संपूर्ण पाचही वर्षांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होती. यावेळी आठ जागा वाढल्याने राजकीय चित्र पालटण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात शिवसेना आणि काँग्रेससह आता भाजपही पाय रोवत आहे. पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकदही मोठी आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीनंतर सत्तेचे गणित बदलण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Zilla Parishad groups, blows to veterans in the formation of gangs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.