जिल्हा परिषदेत युती नाहीच, आघाडीची चिन्हे
By admin | Published: January 20, 2017 03:05 AM2017-01-20T03:05:08+5:302017-01-20T03:05:08+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेची युती होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
निवडणूक : काँग्रेस, राष्ट्रवादीला पडतेय खिंडार, सत्तेच्या लाभाची आस
यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेची युती होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची मात्र आघाडी होण्याची चिन्हे आहेत. परंतु यासाठी केवळ नेते अनुकूल असून काँग्रेस कार्यकर्ते मात्र ‘राष्ट्रवादीची ताकदच कुठे आहे’ असा सवाल करीत विरोध दर्शवित आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी १६ फेब्रुवारीला मतदान घेतले जाणार आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. काँग्रेसने आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता या इच्छुकांचे अर्ज निवड मंडळाच्या शिफारसींसह प्रदेश कार्यालयाकडे पाठविले जातील. या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडीच्या दृष्टीने बोलणी सुरू आहे. त्याचा सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता दोनही पक्षांच्या नेत्यांकडून वर्तविली जात आहे. मात्र या आघाडीबाबत काँग्रेस कार्यकर्ते उत्सुक नाहीत. या कार्यकर्त्यांच्या गटातील सूर असा की, जिल्ह्यात राष्ट्रवादी मोडकळीस आली आहे. पुसद विभागातच राष्ट्रवादीचे तेवढे अस्तित्व आहे. आता तर वणी, कळंब व अन्य तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीला आणखी खिंडार पडणार आहे. त्यामुळे आघाडी करायची कशासाठी असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा सवाल आहे. कार्यकर्त्यांचा हा विरोध झुगारुन नेते मात्र आपले पुढील लोकसभा व विधानसभेचे गणित डोळ्यापुढे ठेऊन आघाडीसाठी अनुकुलता दर्शवित आहे. काँग्रेसमध्येही दिग्रससह अनेक तालुक्यात खिंडार पडणार आहे. त्याचे मोठे नुकसान काँग्रेसला सहन करावे लागू शकते.
इकडे भाजपा आणि शिवसेना यांच्यात युतीबाबत अद्याप कोणतीही ठोस चर्चा नाही. दोनही पक्षाच्या स्थानिक प्रमुख नेत्यांचा ‘इगो’ दुखावल्याने ते युतीसाठी अनुकूल नसल्याचे सांगितले जाते. पालकमंत्री पद काढून घेतल्याने सेना नाराज आहे. त्याचा फटका युतीमधील बोलणीला बसतो आहे. भाजपाला धडा शिकविण्यासाठी एखादवेळी शिवसेनेकडून काँग्रेसच्या सोईची भूमिका घेतली जाण्याची शक्यताही राजकीय गोटात वर्तविली जात आहे. ही भूमिका यवतमाळ तालुक्यात आवर्जून दिसण्याची शक्यता आहे. भाजपाने आता २३ व २४ जानेवारी रोजी आपल्या इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम निश्चित केला आहे. पालकमंत्रीपद आणि अन्य चार आमदारांच्या बळावर जिल्हा परिषद काबीज करण्याची मोर्चेबांधणी भाजपा करीत आहे. शिवसेनाही हिंदुत्व रॅलीच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करणार आहे.
एकूणच जिल्ह्यात भाजपा, शिवसेना स्वतंत्र तर काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत लढण्याची चिन्हे आहेत. त्याचा फटका सत्ताधारी पक्षांना बसू शकतो. (जिल्हा प्रतिनिधी)