जिल्हा परिषद पदाधिकारी हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 10:16 PM2018-05-13T22:16:04+5:302018-05-13T22:16:04+5:30
प्रशासन प्रमुख व इतर काही अधिकारी न सांगताच बैठकींना दांडी मारत असल्याने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी हतबल ठरल्याचे दिसून येत आहे. खुद्द अध्यक्षांनाही वारंवार याचा प्रत्यय येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रशासन प्रमुख व इतर काही अधिकारी न सांगताच बैठकींना दांडी मारत असल्याने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी हतबल ठरल्याचे दिसून येत आहे. खुद्द अध्यक्षांनाही वारंवार याचा प्रत्यय येत आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक सिंगला आणि नवीन पदाधिकाऱ्यांचे ‘ट्युनिंग’ बिघडले होते. प्रत्येक सभेत त्यांचे आणि पदाधिकाºयांसह सदस्यांचे खटके उडत होते. काही सदस्यांनी तर त्यांना चक्क ‘महाराष्ट्राचा बिहार करू नका’, येथपर्यंत सुनावले होते. त्यानंतर त्यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याची हालचालही सुरू झाली होती. मात्र तत्पूर्वीच डॉ.सिंगला यांची येथून बदली झाली. त्यांच्या जागी नवीन वर्षात जलज शर्मा रूजू झाले. ते रूजू होताच पदाधिकारी खूष झाले. मात्र जस जसे महिने उलटू लागले, तस तसे आता पदाधिकारी नाराज दिसत आहेत.
सुरूवातीला शर्मा यांच्याविषयी पदाधिकाऱ्यांच्या मनात चांगली प्रतिमा होती. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या विषयी पदाधिकाºयांचे मत मात्र बदलू लागल्याचे दिसत आहे. काही बैठकींना त्यांनी कुणालाही न सांगताच दांडी मारल्यामुळे हे मतांतर झाल्याची चर्चा आहे. खुद्द अध्यक्षांना कोणतीही कल्पना न देता ते दुसऱ्या बैठकींना निघून जातात, असा आक्षेप आहे. गुरूवारी आयोजित स्थायी समितीच्या बैठकीकडकेही ते फिरकले नाही. ही बैठक गणपूर्तीअभावी बारगळली. त्यामुळे संतापलेल्या अध्यक्षांनी त्यांची थेट आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. शर्मा यांना त्याचवेळी दुसरी महत्वाची बैठक होती, हेही तेवढेच खरे आहे. तथापि किमान अध्यक्षांना कल्पना देऊन त्यांनी त्या बैठकीला जायचे होते, असा पदाधिकाऱ्यांचा सूर आहे.
पदाधिकाऱ्यांनीच बैठक केली तहकूब
गुरूवारची स्थायी समितीची बैठक काहींनी मुद्दाम बारगळविली, अशी चर्चा आहे. बैठकीला अध्यक्ष आणि दोन सभापतींसह शिवसेनेचे दोन सदस्य उपस्थित होते. मात्र उपाध्यक्ष, इतर सभापती आणि सदस्य आले नव्हते. अध्यक्ष खास नागपूरहून या बैठकीसाठी यवतमाळात परतल्या. मात्र एका जबाबदार पदाधिकाऱ्याने आपल्या पक्षासह इतर काही सदस्यांना भ्रमणध्वनीवरून आधीच बैठकीला येऊ नका, अशी सूचना केली. ही बाब खुद्द एका महिला सदस्याच्या पतीनेच कबूल केली. परिणामी ही बैठक तहकूब झाली. यामुळे पदाधिकाºयांमध्येही विसंवाद असल्याचे दिसून येत आहे.