जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या पुन्हा कोरोनाच्या नावाने लांबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 05:00 AM2021-08-06T05:00:00+5:302021-08-06T05:00:18+5:30
राज्य शासनाने बदली प्रक्रिया ऑनलाईन केल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकदाच जिल्हांतर्गत बदल्यांचा लाभ शिक्षकांना मिळाला. त्यात तांत्रिक कारणांमुळे अनेकांवर अन्याय झाल्याची ओरड आहे. कारण नसताना अनेक जण दुर्गम गावांमध्ये अडकून पडले. महागाव, उमरखेड, झरी जामणी, मारेगाव सारख्या तालुक्यांमध्ये शिक्षकांचा तुटवडा निर्माण झाला. तर यवतमाळात अधिकाधिक शिक्षकांनी बदल्या मिळवून घेतल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या दोन वर्षांपासून बदल्यांची प्रक्रियाच न झाल्याने दुर्गम गावातील अनेक शिक्षक यंदा बदली प्रक्रियेकडे आस लावून बसले आहेत. मात्र आता प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याशिवाय बदली प्रक्रिया राबविली जाणार नसल्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यामुळे यंदाच्या सत्रात बदल्याच होणार नसल्याची भीती शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
राज्य शासनाने बदली प्रक्रिया ऑनलाईन केल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकदाच जिल्हांतर्गत बदल्यांचा लाभ शिक्षकांना मिळाला. त्यात तांत्रिक कारणांमुळे अनेकांवर अन्याय झाल्याची ओरड आहे. कारण नसताना अनेक जण दुर्गम गावांमध्ये अडकून पडले. महागाव, उमरखेड, झरी जामणी, मारेगाव सारख्या तालुक्यांमध्ये शिक्षकांचा तुटवडा निर्माण झाला. तर यवतमाळात अधिकाधिक शिक्षकांनी बदल्या मिळवून घेतल्या.
संवर्ग-४ मधील शिक्षक आणि गेल्या वेळी विस्थापित झालेले शिक्षक आतूरतेने बदली प्रक्रियेची वाट पाहत आहे. गेल्या वर्षी सुरू झालेली बदली प्रक्रिया ऐनवेळी कोरोनाच्या कारणाखाली रद्द करण्यात आली. यावर्षीही सुरुवातीला ग्रामविकास विभागाने बदलीचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र ३ ऑगस्ट रोजी सध्याच शिक्षकांच्या बदल्या न करण्याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा सध्या कोरोनामुळे प्रत्यक्ष सुरु करणे शक्य नाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतरच शिक्षकांच्या बदल्या करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यस्तरावरून ऑनलाईन पद्धतीने बदली प्रक्रिया होणार आहे. मात्र युती सरकारच्या काळातील बदली पोर्टलमध्ये चुका असल्याचे सांगत महाविकास आघाडी सरकारने नवे पोर्टल तयार करण्याचा घाट घातला आहे. परंतु नवे पोर्टल नेमके कधी तयार होणार याबाबत निश्चित माहिती देण्यास शिक्षण खात्यातील एक अधिकारी सध्या तयार नाही. तर दुसरीकडे शिक्षकांमधून विनंती बदल्या जिल्हास्तरावरच समूपदेशनाद्वारेच तातडीने करण्याची मागणी जोर धरत आहे. जिल्हा परिषदेतील अन्य विभागांच्या कर्मचाऱ्यांसह खुद्द शिक्षण विभागातील पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच झाल्या.
शाळा उघडणार का, बदलीला वेळ मिळणार का ?
- सध्या कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा उघडणे शक्य नसल्याचे ग्रामविकास विभागाच्या आदेशात म्हटले आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतरच शिक्षकांच्या बदलीचा विचार होणार आहे. परंतु दरवेळी शिक्षकांच्या बदल्या साधारण जूनपूर्वी म्हणजेच प्रत्यक्ष शाळा सुरू हाेण्यापूर्वी केल्या जातात. त्यामुळे नव्या सत्रात शिक्षकांना नवी शाळा ‘जॉईन’ करणे सोपे जाते. विद्यार्थ्यांसाठीही ते सोईचे ठरते. मात्र आता शाळा सुरू झाल्यावर बदल्या करण्याचे शासनाने जाहीर केले. शाळा सुरू असताना शिक्षक बदलल्यास विद्यार्थ्यांची अडचण अधिक वाढणार आहे.
प्रत्यक्ष समूपदेशन झाले, मग ऑनलाईनला अडचण का ?
- ग्रामविकासच्या आदेशानुसारच जिल्हा परिषदेने नुकत्याच गट क आणि ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या समूपदेशनातून केल्या. त्यावेळी एकही कर्मचारी कोरोनाबाधित झाला नाही किंवा कोरोना नियमाचेही उल्लंघन झाले नाही. याशिवाय महसूल खात्यानेही बदली प्रक्रिया पार पाडली. मात्र केवळ शिक्षकांची बदली प्रक्रिया तीही बहुतांश ऑनलाईन असतानाही कोरोनाच्या कारणाखाली टाळली गेली. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.