जिल्हा परिषद शिक्षकांची तारेवरची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 09:46 PM2019-05-22T21:46:59+5:302019-05-22T21:47:31+5:30
इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश आणि कॉन्व्हेंटचे लोण खेड्यापर्यंत पोहोचले आहे़ त्यामुळे प्रत्येक गावात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण होत आहे़ अंगणवाड्या ओस तर, कॉन्व्हेंट फुल्ल अशी स्थिती आहे. विद्यार्थी मिळविण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश आणि कॉन्व्हेंटचे लोण खेड्यापर्यंत पोहोचले आहे़ त्यामुळे प्रत्येक गावात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण होत आहे़ अंगणवाड्या ओस तर, कॉन्व्हेंट फुल्ल अशी स्थिती आहे. विद्यार्थी मिळविण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
पूर्वी तालुका पातळीसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय पर्याय नव्हता़ तेथील अंगणवाड्याही गजबजलेल्या असायच्या़ परंतु आता गावपरिसरामध्ये सेमी इंग्लिश मीडियमच्या शाळा उघडल्या जात आहे़ जिल्हा परिषदे शाळांपेक्षा तेथील शिक्षण दर्जेदार असल्याचे मानुन पदरचे पैसे खर्च करुन विद्यार्थ्यांना खासगी शाळेत दाखल करण्याच्या मानसिकतेत पालकवर्ग दिसून येतो़ शहरी भागातील पालकांच्या स्पर्धेत ग्रामीण पालकांनी उडी घेतली आहे़
दुसरीकडे लहान गावातही कॉन्व्हेंटची गर्दी वाढल्याचे चित्र आहे़ कळंब शहरात तर वार्डापोटी कॉन्व्हेंटची दुकाने आहे़ एवढ्यावर न थांबता येथील शेकडो विद्यार्थी राळेगाव व यवतमाळ येथे खासगी इंग्रजी शाळेमध्ये बसने प्रवास करतात़ एकीकडे खासगी इंग्रजी शाळा तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमांच्या शाळा सुरु आहे़ खासगी इंग्रजी शाळा देणगी, शिक्षण फी, युनिफॉर्म, गॅदरिंग खर्च आदीच्या माध्यमातून पालकांना आर्थिकदृष्ट्या जेरीस आणतात़ खासगी इंग्रजी शाळेत विद्यार्थी टाकणे ही ग्रामीण भागात ‘फॅशन’ झाली आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहे़ या शाळांना तुकडी चालविणे कठीण झाले आहे़ त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरत आहे़ काही शाळा बंद होत आहे. शिक्षक संख्या रोडावत चालली आहे़़
जिल्हा परिषद शाळांनी शिक्षणाची गुणवत्ता आणि संख्यात्मक प्रगती सांभाळणे गरजेचे आहे़ शिक्षणाचे नीट आकलन होणे आणि जीवनमूूल्ये विद्यार्थ्यांत रुजविणे याकरिता मातृभाषेतून शिक्षण मिळावे अशी अनेक पालकांची धारणा असते़ सेमी इंग्लिश पॅटर्नमध्ये या दोन्हींचा सुवर्णमध्ये साधला जाऊ शकतो़ त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळा जिवंत ठेवायच्या असेल तर सेमी इंग्लिश पॅटर्न जिल्हा परिषद शाळांनी सर्वत्र सुरु करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे़ तज्ज्ञ शिक्षकांमार्फत सेमी इंग्रजी वर्गांचे अध्ययन करुन जिल्हा परिषद शाळांचा गुणात्मकदृष्ट्या दर्जा वाढविल्या जाऊ शकतो़ तेव्हा कुठे जिल्हा परिषदेच्या शाळा खासगी शाळांशी स्पर्धा करु शकतील़़