जिल्हा परिषद त्रिशंकू, सेनेला सर्वाधिक जागा

By admin | Published: February 24, 2017 02:27 AM2017-02-24T02:27:06+5:302017-02-24T02:27:06+5:30

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. मतदारांनी केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना,

Zilla Parishad Trishanku, Sena, Most seats | जिल्हा परिषद त्रिशंकू, सेनेला सर्वाधिक जागा

जिल्हा परिषद त्रिशंकू, सेनेला सर्वाधिक जागा

Next

नोटाबंदीचा ‘नो-इफेक्ट’: सेना २०, भाजपाची ४ वरुन १७ जागांवर झेप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जागा घटल्या
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. मतदारांनी केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना, भाजपाला सत्तेचा कौल दिला आहे. नोटाबंदीमुळे ग्रामीण जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागला, आजही अनेक भागात तो होतो आहे, मात्र त्यानंतरही मतदारांनी सत्ताधारी भाजपा, सेनेलाच ‘मिनी मंत्रालयात’ पसंती दिली. या विजयाने मोदी लाट कायम असल्याचे भाजपात मानले जाते.
६१ सदस्यीय जिल्हा परिषद व १६ पंचायत समित्यांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते. त्याची मतमोजणी गुरुवारी सकाळी १० पासून तालुकास्तरावर सुरू झाली. दुपारनंतर निकाल बाहेर येण्यास सुरूवात झाली. सायंकाळी चित्र स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत नाही. त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेने सर्वाधिक २० जागा पटकाविल्या आहेत. त्या खालोखाल भाजपाने १७, काँग्रेस १२, राष्ट्रवादी ११ तर एका जागेवर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या आघाडीचा अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी डझनभर जागांचा फटका बसला. त्यांच्या या जागा भाजपा व शिवसेनेने खेचून घेतल्या आहेत. शिवसेनेने १४ जागांवरून २० जागांवर तर भाजपाने चार जागांवरून १७ जागांवर झेप घेतली. जिल्ह्यात असलेली सत्तेतील प्रचंड ताकद व मोदी लाटेचा फायदा उठवित भाजपाने आपल्या जागा चौपटीने वाढविल्या. मनसे किंवा अन्य पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. राष्ट्रवादीही अपेक्षेनुसार पुसद या बालेकिल्ल्यातच राहिली. बाहेर या पक्षाला केवळ एका जागेवर यश मिळाले. काँग्रेसची नेते मंडळी ‘वाऱ्याची झुळूक आली तरी पक्ष वाढतो’ असे सांगून ३५ जागांवर दावा करीत होती. मात्र प्रत्यक्षात त्यांना अवघ्या १२ जागांवर समाधान मानावे लागले. जागा वाढणे तर दूर उलट अर्ध्या कमी झाल्या. नेत्यांमधील गटबाजीचा हा परिणाम मानला जातोय. जिल्हा परिषदेमध्ये भाजपा, सेनेच्या सत्तेची चिन्हे दिसू लागली आहे. मात्र या दोनही पक्षाच्या स्थानिक नेत्यांना वरून काय आदेश येतो याची प्रतीक्षा आहे. हा आदेश न आल्यास सत्ता स्थापनेसाठी युती व आघाडीत ‘क्रॉस’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निवडणुकीत शिवसेनेने तीन तालुक्यांमध्ये मिळविलेले एकहाती व निर्विवाद यश उल्लेखनीय ठरले. ग्रामीण मतदारांनी जिल्हा परिषदेत शिवसेना व भाजपाला कौल दिल्याने या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळतो आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचा अध्यक्ष होण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने सत्तेचा लाभ घेतला होता. मात्र त्यावेळी केवळ सभापती पदांवर समाधान मानावे लागले होते. परंतु ही युती फार काळ टिकली नाही. त्या सभापतींनीही पक्षाशी फारकत घेतली होती. या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षातील नेत्यांना आपली ताकद दाखविण्याची संधी मिळाली. त्यात उमरखेड व आर्णीचे भाजपा आमदार अपयशी ठरले. असेच निकाल या मतदारसंघात २०१९ मध्येसुद्धा येणार नाहीत ना अशी हूरहूर भाजपा कार्यकर्त्यांना आतापासूनच लागली आहे. संजय राठोड यांनी आपल्या बंधूला निवडून आणून प्रतिष्ठा राखली. मात्र पुसदचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार मनोहरराव नाईक त्यात अपयशी ठरले. त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक पराभूत झाले. त्यांना कुटुंबातीलच तरुण सदस्य भाजपाचे अमेय नाईक यांनी पराभवाची धूळ चारली. अमेयचे नेतृत्व भाजपाचे अ‍ॅड. निलय नाईक यांच्या खांद्यावर होते, हे विशेष. या पराभवामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये २०१९ च्या निवडणुकांबाबतही हूरहूर पहायला मिळत आहे. दिग्रसमध्ये माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वात भाजपाचे चांगलेच पानीपत झाले. (जिल्हा प्रतिनिधी)

दिग्गज विजयी
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काही दिग्गज विजयी झाले. ते पहिल्यांदाच निवडून आले असले तरी त्यांच्या मागे उभे असलेल्या ताकदीवरून त्यांना दिग्गज मानले जात आहे. त्यामध्ये महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे बंधू विजय राठोड, नुकतेच भाजपात गेलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. निलय नाईक यांचे पुतणे अमेय नाईक, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची स्नुषा किरण मोघे, माजी आमदार अ‍ॅड. अनंतराव देवसरकर यांचे पुत्र राम देवसरकर, दिवंगत ज्येष्ठ नेते सुरेश लोणकर यांचे पुत्र आशिष लोणकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश मानकर यांचे पुत्र निमीष मानकर यांचा समावेश आहे.

भाजपाच्या जागा १७ की १८ ? : निवडणूक विभागाचा गोंधळ
जिल्हा परिषदेत भाजपाच्या जागा १७ की १८ याचा गोंधळ उशिरा रात्रीपर्यंत सुरू होता. खुद्द निवडणूक विभागही हा गुंता सोडवू शकले नाही. जिल्हा निवडणूक विभागाने स्वत: जाहीर केलेल्या अधिकृत पत्रकात आणि जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पाठविलेल्या पत्रात भाजपाच्या एकूण १७ जागा दाखविल्या गेल्या. झरी तालुक्यातील जागेचा वाद होता. तेथे दोनही जागा भाजपाने जिंकल्याने तेथील तहसीलदारांनी सांगितले. तर जिल्हा निवडणूक विभाग तेथे एक जागा काँग्रेस व एक जागा भाजपाला दाखवित आहे. त्यामुळे भाजपाची संख्याबळ १७ की १८ हे वृत्तलिहिस्तोवर अधिकृतरीत्या स्पष्ट होऊ शकले नव्हते.

दिग्गज पराभूत
जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष राष्ट्रवादीच्या डॉ. आरती फुपाटे, पुसदचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार मनोहरराव नाईक यांचे पुत्र विद्यमान उपाध्यक्ष ययाती नाईक, माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, सभापती लता खांदवे व सुभाष ठोकळ, माजी सभापती तातू देशमुख, पांढरकवडा बाजार समितीचे सभापती प्रकाश मानकर, यवतमाळ बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, काँग्रेसचे बंडखोर देवानंद पवार, राष्ट्रवादीच्या क्रांती धोटे, योगेश पारवेकर आदींचा समावेश आहे.

Web Title: Zilla Parishad Trishanku, Sena, Most seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.