जिल्हा परिषदेत येणार महाविकास आघाडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:00 AM2020-01-13T06:00:00+5:302020-01-13T06:00:04+5:30

अडीच वर्र्षांपूर्वी सर्वाधिक मोठा पक्ष असूनही शिवसेनेला सत्तेबाहेर रहावे लागले होते. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ऐनवेळी सत्ता स्थापन केली होती. परिणामी शिवसेना विरोधी बाकावर गेली. मात्र यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषदेतही आघाडीची सत्ता स्थापन करण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेण्यात आला.

Zilla Parishad will be a major development front | जिल्हा परिषदेत येणार महाविकास आघाडीच

जिल्हा परिषदेत येणार महाविकास आघाडीच

Next
ठळक मुद्देसत्तेचा फॉर्म्युला तयार : तब्बल पाच तासांच्या बैठकीनंतर निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी सोमवारी विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील पक्षांनी घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत आता महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे.
अडीच वर्र्षांपूर्वी सर्वाधिक मोठा पक्ष असूनही शिवसेनेला सत्तेबाहेर रहावे लागले होते. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ऐनवेळी सत्ता स्थापन केली होती. परिणामी शिवसेना विरोधी बाकावर गेली. मात्र यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषदेतही आघाडीची सत्ता स्थापन करण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेण्यात आला. त्यानुसार शनिवारी आर्णी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांच्या निवासस्थानी तीनही पक्षाच्या नेत्यांची मॅरेथॉन बैठक पार पडली. तब्बल पाच तास ही बैठक सुरू होती. या बैठकीला वनमंत्री संजय राठोड, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री मनोहरराव नाईक, अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, काँग्रेसचे निरीक्षक श्याम उमाळकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, पराग पिंगळे, माजी आमदार वामनराव कासावार, विजय खडसे, विश्वास नांदेकर आदी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा परिषदेतील सत्तेच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यात अध्यक्ष आणि दोन सभापतीपदे शिवसेनेला, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला तर दोन सभापती पदे काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या सत्तेचा मार्ग सूकर झाला आहे. सोमवारी दुपारी ३ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान आर्णी येथील बैठकीत विधान परिषद निवडणूक आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भातही चर्चा करण्यात आली. या संदर्भात पुन्हा चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आज ११ वाजता ठरणार नाव
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी सोमवारी ११ वाजता दारव्हा रोडवरील एका हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या सदस्यांची बैठक आयोजित आहे. यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांसह या तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहे. हे नेतेच सकाळी ११ वाजता अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे नाव जाहीर करणार आहे.

अध्यक्षपदासाठी प्रचंड चुरस
शिवसेनेकडे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद येण्याचे संकेत आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पुरुष सदस्यांचा हिरमोड झाला आहे. दुसरीकडे महिला सदस्यांमध्ये अध्यक्षपदासाठी चुरस आहे. शिवसेनेच्या चार महिला सदस्य अध्यक्षपदासाठी आग्रही आहेत. या संदर्भात रविवारी शिवसेना नेते, पदाधिकारी व सदस्यांची बैठक झाली. त्यात अर्ज वाटप करण्यात आले. मात्र अद्यापही कोणत्याच नावावर एकमत झाले नसल्याचे सांगण्यात आले.

विधान परिषद उमेदवारीसाठी स्पर्धा
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या रिक्त जागेसाठी ३१ जानेवारीला मतदान होत आहे. बैठकीत ही जागा शिवसेनेला सोडण्याबाबतही मतैक्य झाले. शिवसेनेत अनेक इच्छुक आहे. यात काँग्रेसचे नागपूर येथील माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांचे नाव आघाडीवर आहे. दुष्यंत चतुर्वेदी यांनी काही महिन्यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. १४ जानेवारी ही उमेदवारी दाखल करण्याची अखेरची तारीख आहे. दरम्यान शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी ते सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Zilla Parishad will be a major development front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.