जिल्हा परिषदेत राहणार ६१ गट
By Admin | Published: August 26, 2016 02:26 AM2016-08-26T02:26:53+5:302016-08-26T02:26:53+5:30
जिल्हा परिषदेसाठी ६१ गट राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. निवडणूक विभागाने त्यावर शिक्कामोर्तबही केले आहे.
यवतमाळ : जिल्हा परिषदेसाठी ६१ गट राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. निवडणूक विभागाने त्यावर शिक्कामोर्तबही केले आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही.
जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी जागांच्या आरक्षणासह प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर करण्याचा कार्यक्रम निवडणूक विभागाने घोषित केला आहे. २३ सप्टेंबरला विभागीय आयुक्त प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देणार आहे. पुढील १५ दिवसांत गट आणि गणांचे चित्र स्पष्ट होणार आहे. यापूर्वी ६२ गट आणि १२४ गण होते. मात्र आता २०१७ च्या निवडणुकीत ६१ गट आणि १२२ गण राहणार असल्यावर निवडणूक विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. तथापि त्यासंबंधी अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाही.
यवतमाळ तालुक्यातील वडगाव गट या निवडणुकीत रद्द झाला आहे. या गटातील दोन गणही आता रद्द होण्याची शक्यता आहे. परिणामी यवतमाळ तालुक्यातील एक जिल्हा परिषद सदस्य कमी झाला असून पंचायत समिती सदस्यही कमी होण्याची शक्यता आहे. मात्र पंचायत समितीचे गण कमी होतील, की नाही याबाबत अद्याप साशंकता आहे. संबंधित गणात समाविष्ट इतर गावांना दुसऱ्या गणात समाविष्ट करण्यात येईल, की तो गण दुसऱ्या नावाने तसाच राहील, याबाबतही संभ्रम कायम आहे. येत्या ९ सप्टेंबरपर्यंत प्रारूप प्रभाग रचना पूर्ण होणार आहे. त्यावेळीच गट आणि गणांची स्थिती स्पष्ट होणार आहे. (शहर प्रतिनिधी)