पूरग्रस्त शाळांना जिल्हा परिषद करणार मदत
By अविनाश साबापुरे | Published: July 25, 2023 08:45 PM2023-07-25T20:45:47+5:302023-07-25T20:45:55+5:30
वह्या, पुस्तक, दप्तर खरेदीसाठी देणार पैसे : पण इमारत नुकसानीचे काय?
यवतमाळ : ढगफुटीसदृश पावसामुळे जिल्ह्यात आतोनात नुकसान झाले. यात अनेक जिल्हा परिषदशाळांमध्ये पुराचे पाणी घुसले. अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद पंधराव्या वित्त आयोगातून मदत करणार आहे.
ही मदत देण्यासाठी पूरग्रस्त शाळांमधील माहिती सादर करण्याचे आदेश मंगळवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून संबंधित शाळेतील पटसंख्या, पुरामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या, नुकसानीचे स्वरूप आणि भरपाईसाठी लागणारी रक्कम असा अहवाल तातडीने मागविण्यात आला आहे. पुरामुळे अनेक शाळेतील विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तके, दप्तर आदी वस्तू वाहून गेलेल्या आहेत. अनेक गावांमधील शाळा सुरक्षित असल्या तरी विद्यार्थ्यांची घरे नुकसानग्रस्त झाली आहे. अशा विद्यार्थ्यांना नवीन साहित्य खरेदी करता यावे, यासाठी १५ व्या वित्त आयोगातून निधी दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना साहित्य खरेदीसाठी जिल्हा परिषदेकडून मदत होणार असली तरी शाळा इमारतींच्या नुकसानीचा प्रश्न कायम आहे. जिल्ह्यात पावसामुळे अनेक शाळांच्या भिंती खराब झाल्या, वाॅल कम्पाउंड पडले, नव्याने केलेली रंगरंगोटी खराब झाली. परंतु, या कामांच्या दुरुस्तीचा खर्च कुठून होणार, हा प्रश्न कायम आहे.
२१ ठिकाणचा शालेय पोषण आहार भिजला
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आलेले पोषण आहाराचे धान्य साठवून होते. परंतु, मुसळधार पावसादरम्यान या धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २१ शाळांमधील हा पोषण आहाराचा माल पूर्णत: भिजून खराब झाला आहे. आधीच हे धान्य येण्यासाठी मुख्याध्यापकांना वाट पाहावी लागते, तर आता भिजलेल्या धान्यामुळे विद्यार्थ्यांना आहार नेमका कसा द्यावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.