जिल्हा परिषदेचे साडेपाच हजार शिक्षक बदलीपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:11 PM2018-03-14T22:11:58+5:302018-03-14T22:11:58+5:30
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल साडेपाच हजारांच्यावरील शिक्षक बदलीपात्र ठरले आहे. या शिक्षकांची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी येत्या ३१ मार्चपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदांना ३१ मेपूर्वी बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांनी आपल्यास्तरावर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा परिषदेने पंचायत समितीस्तरावर बदलीपात्र शिक्षकांची यादी प्रकाशित करून त्यावर दावे व हरकती मागितल्या होत्या. ही प्रक्रिया नुकतीच संपल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी पप्पू भोयर यांनी सांगितले. आता जिल्हास्तरावरील अंतिम सेवा ज्येष्ठता यादीकडे बदलीपात्र शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेत जवळपास आठ हजारांच्यावर शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या बदल्या झाल्या नाही. त्यामुळे काही संघटनांनी बदल्या करण्याची मागणी रेटली होती. तथापि काही संघटनांचे पदाधिकारी मात्र विविध कारणांनी बदली प्रक्रियेत खोडा घालतात. त्यामुळे गेली तीन वर्षे ही प्रक्रिया रखडल्याचे दिसून येत आहे. सामान्य शिक्षकांना बदली व्हावीच, अशी अपेक्षा आहे. शासनाने त्यादृष्टीने यावर्षी बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे.
येत्या २० मार्चपूर्वी जिल्ह्यातील बदलीपात्र शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाईल, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे. या यादीवर शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आक्षेप, हरकती, दुरुस्तीबाबत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यावर सीईओंच्या निकालानंतर अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानुसार शिक्षकांच्या आॅनलाईन पद्धतीने बदल्या होणार असल्याचे सांगितले जाते.
बदल्या होणार असल्याने शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आॅनलाईन बदल्यामुळे घोडाबाजारात ब्रेक लागणार आहे. प्रशासन कशा पद्धतीने पारदर्शक बदल्या करतात आणि योग्य न्याय देतात याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
सामान्य शिक्षकांना हवी बदली
काही शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यवतमाळ शहरालगतच्या शाळा मिळविण्यासाठी नेहमी बदली प्रक्रियेत खोडा घालतात. त्यामुळे इतर हजारो शिक्षकांवर अन्याय होतो. अनेक शिक्षक गेल्या काही वर्षांपासून दुर्गम भागात सेवा देत आहे. त्यांना आता बदलीची प्रतीक्षा आहे. सामान्य शिक्षक कोणत्याही स्थितीत बदल्या व्हाव्याच या मानसिकतेत दिसून येत आहे.